केज तालुक्यातून आणखी दोन तरुणी बेपत्ता ; एक अल्पवयीन

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावांमधून दोन तरुणी बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी तर दुसरी १९ वर्षीय तरुणी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
तुकुचीवाडी येथील इयत्ता आठवीत शिक्षण घेणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी बुधवार,दि.११ मार्च रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली. संबंधित मुलगी आई जवळ झोपलेली असताना रात्री तिचे वडील शेतातील पिकांची राखण करून घरी परतले असता मुलगी घरात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यानंतर कुटुंबीयांनी गावात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला ; मात्र मुलगी कुठेही आढळून आली नाही.याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याचा गुन्हा केज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान,दुसरी घटना बोबडेवाडी येथे घडली आहे.दि.२८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० साडेपाच वाजण्याच्या सुमारास १९ वर्षीय तरुणी शेतमजुरांचे मजुरीचे पैसे देण्यासाठी गावात गेली होती.मात्र त्यानंतर ती परत घरी आली नाही.संबंधित तरुणीने नुकतीच बारावीची परीक्षा दिलेली असल्याची माहिती मिळाली आहे.
कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेही आढळून न आल्याने तिच्या वडिलांनी केज पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.या दोन्ही प्रकरणांचा तपास पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम करीत आहेत. दरम्यान,तालुक्यातुन सलग दोन तरुणी बेपत्ता झाल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

