गुन्हेगारीसामाजिक

बेकायदेशीर ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग ठरली जीवघेणी ; विजेच्या धक्क्याने पोखरीच्या तरुणाचा मृत्यू, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील लाडेवडगाव येथे शेतातील ट्रान्सफॉर्मर (एचव्हीडीएस डीपी) दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचे बेकायदेशीर काम करत असताना, वीज पुरवठा अचानक सुरू झाल्याने विजेचा तीव्र धक्का लागून संतोष सोनेराव निकम वय ३८ वर्ष रा.पोखरी ता. अंबाजोगाई या तरुण कामगाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना मंगळवार दि. २६ मे रोजी दुपारी लाडेवडगाव शिवारात घडली.कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षेची साधने न पुरवता,कमालीचा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा करून मजुराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी खाजगी कंत्राटदार सचिन भागवत शेप,शेतकरी सुभाष शाहूराव ढाकणे आणि महावितरणच्या एका लाईनमन विरुद्ध युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाडेवडगाव येथील शेतकरी सुभाष ढाकणे यांच्या शेतात ‘एक शेतकरी,एक ट्रान्सफॉर्मर’ या योजनेअंतर्गत महा वितरणची डीपी उभारण्यात आली होती. ही डीपी शासकीय नियम बाजूला ठेवून,शिफ्टिंग चार्ज वाचवण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय आणि त्यांना अंधारात ठेवून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचे काम खाजगी कंत्राटदार सचिन शेप याच्या माध्यमातून सुरू होते.

या कामासाठी संतोष निकम यांच्यासह इतर तीन मजुरांना रोजंदारीवर बोलावण्यात आले होते.काम सुरू करण्यापूर्वी वीज पुरवठा खंडित केल्याची खात्री करण्याचे काम लाईनमन चे होते.लाईनमनने वीज पुरवठा बंद असल्याचे सांगून तिथून पळ काढला,तर कंत्राटदार आणि शेतकऱ्याने संतोष यांना खांबावर चढण्यास सांगितले.संतोष सोनेराव निकम हे ट्रान्सफॉर्मर वरील मुख्य वायर सोडवण्यासाठी वर चढले असता,अचानक वीजप्रवाह सुरू झाला. विजेचा जोरदार झटका बसल्याने संतोष थेट खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कंत्राटदार लाईनमन यांचे घटनास्थळावरून पलायन

दरम्यान अपघातानंतर कंत्राटदार सचिन शेप घटनास्थळावरून आणि रुग्णालयातून पळून गेला या घटनेची माहिती मिळताच मृताच्या नातेवाईकांनी आणि पोखरी येथील ग्रामस्थांनी अंबाजोगाई येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालया समोर आक्रमक पवित्रा घेतला.

दोषी कंत्राटदार, लाईनमन आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही,अशी भूमिका घेत नातेवाईकांनी तीव्र आंदोलन केले.अखेर महावितरणच्या धारूर उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता गोकुळ मोरे आणि कनिष्ठ अभियंता अभिजित पाटील यांनी दिलेल्या पत्रानंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली. मृतक संतोष यांचे भाऊ प्रदीप सोनेराव निकम यांनी दिलेल्या जबाबा वरून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!