केज येथे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या निवासस्थानी शेतकऱ्यांची वाजत- गाजत गाऱ्हाणे पदयात्रा ; 2025 पीक विमा मंजुरीची जोरदार मागणी

केज/प्रतिनिधी
सन- २०२५ च्या पीक विमा मंजुरी संदर्भातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत आणि पात्र शेतकऱ्यांना न्याय्य विमा रक्कम मिळावी या मागणीसाठी केज येथे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या निवासस्थानी शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे पदयात्रा वाजतगाजत काढली.शेतकरी संघर्ष समितीचे नेते भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली ही गाऱ्हाणे पदयात्रा काढण्यात आली असून, यावेळी खासदारांना निवेदन देऊन पीक विम्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस,दुष्काळसदृश परिस्थिती आणि इतर संकटांचा सामना करत पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. उपलब्ध माहितीनुसार, जिल्ह्यातील ९० हजार ४१८ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा उतरविण्यात आला असून शेतकऱ्यांनीएकूण ५ कोटी २४ लाख ३९ हजार ८२० रुपयांचा प्रीमियम भरला आहे. मात्र,एवढा मोठा प्रीमियम भरूनही अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित विमा मंजुरी मिळालेली नसल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांनी विमा कंपन्या आणि संबंधित प्रशासनाच्या कार्यपद्धती वर प्रश्न उपस्थित केले. नुकसान होऊनही अनेक पात्र शेतकऱ्यांना विमा लाभ मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. तसेच विमा मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात तातडीने विमा रक्कम जमा करावी अशी मागणी करण्यात आली.खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांना देण्यात आलेल्या निवेदनात शेतकऱ्यांच्या विविध अडचणींचा उल्लेख करण्यात आला असून,जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासन तसेच संबंधित विमा कंपन्यां कडे प्रभावी पाठपुरावा करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.
मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की,त्यांनी भरलेल्या प्रीमियमच्या आणि प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या तुलनेत त्यांना योग्य व न्याय्य पीक विमा मिळावा,हीच त्यांची प्रमुख मागणी आहे.शासन आणि विमा कंपन्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही यावेळी देण्यात आला.
खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी याबाबत आपण मुख्यमंत्र्याची भेट घेवून प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.या पदयात्रेमुळे केज शहरात काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते.आता शेतकऱ्यांच्या मागण्यां बाबत प्रशासन व विमा कंपन्या कोणती भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.या पदयात्रेत केज धारूर व माजलगाव तालुक्यातील शेतकरी बांधव मोठया संख्येने सहभागी होते.



