पहिल्या पत्नीने जाब विचारला म्हणुन तिच्यावर ‘वस्तऱ्याने’ वार केला,केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

केज/प्रतिनिधी
केज येथील क्रांतीनगर भागात राहणाऱ्या पती-पत्नी मधील किरकोळ वाद विकोपाला गेल्यामुळे,पहिली पत्नी माहेरी असताना पतीने अवघ्या चार महिन्यांत दुसऱ्या महिलेसोबत लग्न केल्याची धक्कादायक घटना केज येथे घडली असून.पहिल्या पत्नीने आपल्या पतीला याचा जाब विचारला असता, पतीने तिच्या कपाळावर धारदार वस्तऱ्याने वार करून इतर तिघां सोबत संगनमत करून पहिल्या पत्नीला बेदम मारहाण केल्या प्रकरणी पहिल्या पत्नीच्या फिर्यादीवरून पती विरुद्ध केज पोलिसात गून्हा नोंद झाला आहे.
केज येथील क्रांतीनगर भागात राहणारे सतीश लांडगे आणि त्यांची पत्नी अंजना लांडगे यांच्यात चार महिन्यांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणामुळे अंजना लांडगे या क्रांतीनगर येथील मुलाच्या घरी राहत होत्या.याच दरम्यान, सतीश लांडगे यांनी दुसऱ्या महिलेशी लग्न करून तिच्यासोबत राजरोस राहण्यास सुरुवात केली.नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच अंजना लांडगे यांनी याबाबत आपल्या पतीकडे विचारणा केली, व सामान आणि घर बांधण्यासाठी दिलेले 2 लाख रुपये परत मागितले असता, सतीश लांडगे यांनी त्यांना घराबाहेर हाकलून दिले.
अंजना लांडगे यांचा मुलगा आणि सून दि.7 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजता ऊस तोडणीसाठी साखर कारखान्यावर गेले असताना,अंजना लांडगे या घरी एकट्या असल्याच्या संधीचा फायदा घेऊन,पती सतीश लांडगे याच्यासह अलका रोहीदास मुजमुले, किरण रोहीदास मुजमुले आणि कुणाल रोहीदास मुजमुले हे चौघेजण त्यांच्या घरात घुसले.व त्यांनी अंजना लांडगे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. पती सतीश लांडगे यानी क्रूरतेची परिसीमा गाठत अंजना लांडगे यांच्या कपाळावर धारदार वस्तऱ्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
या घटनेनंतर अंजना लांडगे यांच्या फिर्यादी वरून पती सतीश लांडगे, अलका मुजमुले,किरण मुजमुले आणि कुणाल मुजमुले या चौघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार त्रिंबक सोपने हे पुढील तपास करीत आहेत.

