केजच्या विशेष पथकाचा मस्साजोग शिवारात छापा,९ लाख ११ हजार रुपयाचा गुटखा जप्त

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील मस्साजोग शिवारातील रंजित बाजीराव देशमुख यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडवर केज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी स्थापन केलेल्या विषेश पथकाने शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान दोन पंचांच्या साक्षीने छापा मारून ९ लाख ११ हजाराचा राज्य शासनाने बंदी घातलेला गुटखा,व सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी रोहित देशमुख याला जेरबंद करण्यात आले आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली की, मस्साजोग शिवारात काळेगाव रस्त्यालगत असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये गुटख्याचा साठा करण्यात आला आहे. त्यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक जावेद कराडकर,पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार,जमादार विकास चोपणे, बालासाहेब डापकर, धोंडीराम मोरे,विशाल क्षीरसागर,अशफाक इनामदार यांनी दोन खाजगी पंचाना सोबत घेवून शुक्रवारी दुपारी २ वाजता छापा टाकला असता राज्य शासनाने बंदी घातलेला गुटखा, विविध रंगाच्या गोण्यात भरून त्याचा साठा केल्याचे दिसून आले.
एकूण ९ लाख ११ हजार ४० रुपयाचा गुटखा, सुगंधी तंबाखू असे साहित्य जप्त करण्यात आले असून रात्री उशिरा पोलीस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार यांच्या फिर्यादीवरून रोहित आसाराम देशमुख विरुद्ध राज्य शासनाने बंदी घातलेला गुटखा, सुगंधी तंबाखू असा स्वत:च्या फायद्यासाठी जवळ बाळगून त्याचा संग्रह केला म्हणुन गून्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.


