प्रा.बबनराव आंधळे यांना विधान परिषदेत संधी द्यावी,बीड जिल्ह्यातून जनतेची जोरदार मागणी

बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले बानेगाव येथील प्रा.बबनराव आंधळे यांना महाराष्ट्र विधान परिषदेत संधी द्यावी, अशी मागणी आता जिल्ह्यातून जोर धरू लागली आहे.दि. ८ जानेवारी १९७५ रोजी बानेगाव येथे माता मुक्ताई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. वडील दगडू आंधळे हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे अल्पभूधारक शेतकरी होते.अत्यंत सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेत त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
प्रा.आंधळे यांनी प्राथमिक शिक्षण गावात पूर्ण केल्यानंतर बीड येथील मागासवर्गीय वस्तीगृहात राहून पुढील शिक्षण घेतले.पाचवी ते दहावीपर्यंत भगवान विद्यालयात,अकरावी -बारावी बंकट स्वामी महाविद्यालयात तर पुढे बलभीम महाविद्यालय, बीड येथे त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. मार्गदर्शक प्रा. सुशीलाताई मोराळे यांच्या प्रेरणेने जून १९९३ मध्ये संत तुकाराम प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे.सामाजिक भान जपत प्रा.आंधळे यांनी ओबीसी,शेतकरी तसेच दलित-वंचित बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी नेहमीच आवाज उठवला.विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी अन्यायाविरोधात लढा दिला.
ग्रामीण युवक संघटनेच्या माध्यमातून युवकांना रोजगार, प्रशिक्षण आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांनी आंदोलने,धरणे आणि मोर्चे काढले.तसेच दिवंगत रामविलास पासवान दूरसंचार मंत्री असताना त्यांची बीड जिल्हा दूरसंचार सल्लागार समितीवर निवड झाली होती. त्यांनी लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.२००० पासून ते बानेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.गावात मुलगी जन्माला आल्यास तिच्या नावाने आर्थिक मदत देण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी राबवला.महिलां साठी बचत गट स्थापन करून त्यांना उद्योगा साठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले.
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.भीक मागो आंदोलन,बीडला रेल्वे आणण्यासाठीचे आंदोलन यांसारख्या विविध चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.बीड जिल्हा लोकशाही पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.२०२६ मध्ये त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रा.बबनराव आंधळे यांना विधान परिषदेत संधी मिळाल्यास वंचित बहुजन समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.



