सावत्र बापाचा १३ वर्षीय मुलीवर अत्याचार, नात्याला काळीमा फासणारी आठवड्यातील दुसरी घटना

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील एका खेडे गावात नात्याला काळिमा फासणारी आठवड्यातील दुसरी घटना उघडकीस आली असून अवघ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चक्क तिच्या सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केला असून, या नराधमावर केज पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या आईचे तीच्या पतीसोबत मतभेद झाल्यामुळे तीने त्याच्या पासून नऊ वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिने आरोपी सोबत दुसरे लग्न केले होते.या दुसऱ्या लग्ना पासून त्यांना एक मुलगाही झाला आहे. गुरूवार दि.९ एप्रिल रोजी पीडित अल्पवयीन मुलीची आई तिच्या माहेरी गेल्याची संधी साधून दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान सावत्र पित्याने घरी येऊन मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून त्याने गैरफायदा घेतला.
साडे तीन वर्षांच्या मुलाला खेळायला मोबाईल देऊन त्यात गुंतवून ठेवले आणि अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद चाळे केले.अल्पवयीन मुलीने त्याला विरोध करून आईला सांगण्याची धमकी दिली.मात्र, आईला सांगायचे नसते, आपल्यात भांडणे होतील,असे म्हणून त्याने मुलीवर बळजबरीने अत्याचार केला.आई घरी आल्यानंतर मुलगी नाराज असल्याचे तिच्या निदर्शनास आले.आईने विचारले असता सुरुवातीला मुलगी प्रचंड घाबरलेली असल्याने काहीच बोलली नाही, मात्र आईने विश्वासात घेऊन विचारल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला.
त्यानंतर पीडितेच्या आईने केज पोलिस ठाण्यात धाव घेत नराधम सावत्र पित्याविरोधात केज पोलिसात तक्रार दाखल केली.दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक प्रकाश शेळके हे पुढील तपास करीत आहेत.


