बोबडेवाडीच्या शंकर करपे महाराजावर केज अंनिसची कार्यवाही!

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील बोबडेवाडी येथील शंकर करपे महाराज गेल्या कांही वर्षांपासूनलोकांना वेगवेगळया आजारावर इलाज करतो,लहान मुले व महिलावर उपचार करून त्यांच्या समस्या सोडवतो असे सांगून सामान्य लोकांना गंडविण्याचे काम करत होता.यापूर्वी चार महिन्यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बीड जिल्ह्यातील अशा तक्रार प्राप्त भोंदू लोकांची नावासह यादी जाहीर करून कार्यवाहीचा इशारा दिला होता. त्यानंतर बऱ्याच ठिकाणच्या अशा भोंदू महाराजबाबांनी लोकांना फसवण्याचे धंदे बंद केले होते.मात्र जिल्ह्यातील कांही ठिकाणची भोंदूगिरी बंद झालेली नव्हती.
महाराष्ट्रअंधश्रद्धा निर्मूलन समितीला जिल्ह्यातून अशा भोंदू महाराजांची माहिती व तक्रारी भेटल्या आहेत. त्यानुसार दि.१७ एप्रिल रोजी शुक्रवारी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बीड जिल्हा अध्यक्ष हनुमंत भोसले, केज शाखेचे कार्याध्यक्ष गौतम बचूटे आणि बुवाबाजी संघर्ष समिती चे सचिव डॉ.हनुमंत सौदागर यांनी बोबडेवाडी येथील शंकर करपे महाराज याच्याकडे भेट देऊन जाब विचारला असता संबंधित भोंदू महाराजाने आपणांस कांहीही येत नसल्याची कबुली दिली तसेच यापुढे आपण अशी भोंदूगिरी कधीही करणार नाही अशी कबुली ही दिली आहे.
आपणांस कसलीही रिद्धी सिद्धी नसून लोकच स्वतः होऊन येऊन भाग पाडत होते.मात्र यापुढे भविष्यात आपण कोणतीही अशी कृती करणार नाही अशी कबुली दिली. समितीचे सदस्य भोंदू महाराजाच्या अर्धा तास समवेत असताना अमावस्याचे औचित्य साधून अनेक लोक आपल्या समस्या घेवून या महाराजाकडे आलेले दिसले.यापूर्वी या भोंदू महाराजाकडे राज्यातील अनेक आमदार व इतर उच्च पदस्थ राजकीय केज व बीड जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी या महाराजाकडे समस्या घेवून भेटून गेल्याची माहिती मिळत आहे. केज शहरातील कांही प्रतिष्ठित लोकांनीही या महाराजाकडे आपल्या समस्या सोडवण्यासाठी हजेरी लावल्याची माहिती पुढे येत आहे.
यावरून लोक किती कमजोरआत्मविश्वासाचे, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास न ठेवता कर्मकांडावर विश्वास ठेवून बुद्धी गहाण ठेवणारे अविवेकी लोक आहेत याची कल्पना येते.या महाराजांबद्दल कांही तक्रारी वरून पुराव्यासह आणखी माहिती गोळा केली जात आहेत.ही माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीच्या मुख्य कार्यालयाकडे पाठवली जाणार असून कायद्या अंतर्गत योग्य ती पोलीस कार्यवाही केली जाणार आहे.
केज तालुक्यासह बीड जिल्ह्यातील सर्व अशा भोंदू महाराजावर कार्यवाही मोहीम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बीड जिल्हा समिती व सर्व तालुका शाखानीं पोलिसांच्या मदतीने हाती घेतली आहे.या महाराजावर पुराव्यासह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोणा विरोधी कायदया अंतर्गत गुन्हें दाखल केले जातील अशी माहितीही हनुमंत भोसले यांनी दिली आहे.
धर्म व अध्यात्म विषयक श्रद्धा ही वेगळी बाब आहे मात्र याच्या आडून सामान्य व अशिक्षित दुर्दैवाने या अशिक्षितामध्ये अंधश्रद्धा व भोंदूगिरीचे समर्थन करणारे बहुतांश तथाकथित उच्य शिक्षितांचा तसेच उच्य पदस्थ आयएएस व आयपीएस सारख्या उच्य पदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील समाजप्रेमी व शोषण विरोधी नागरिकांनी आपल्या परिसरातील अशा भोंदू महाराज बाबांची संपूर्ण माहिती,पुरावे आणि तक्रारीसह माहिती ९४२३७३३८८८ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावी आणि महिला व समाजाचे शोषण करणाऱ्या विरोधातील या लढ्यात निर्भयपने सहभागी व्हावे असे आवाहनही बीड जिल्हा अंनिसच्या वतीने जिल्हा अध्यक्ष हनुमंत भोसले, कार्याध्यक्ष प्रदीपचव्हाण, हनुमंत सौदागर व गौतम बचूटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.



