
केज/प्रतिनिधी
दुबई येथे सध्या सुरू असलेले जगप्रसिद्ध गल्फ फूड प्रदर्शन हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अन्नप्रक्रिया व कृषी क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते. या भव्य प्रदर्शनात जग भरातील अन्नप्रक्रिया उद्योग,कृषी-उत्पादक कंपन्या,निर्यातदार, व्यापारी तसेच उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.खासदार बजरंग सोनवणे हे सध्या या प्रदर्शनात उपस्थित असून त्यांनी या प्रदर्शनाचे भारतीय कृषी क्षेत्रासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले आहे.
गल्फ फूड प्रदर्शनामुळे भारतीय कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाला जागतिक बाजारपेठेशी थेट संपर्क साधण्याची मोठी संधी मिळत आहे. भारतीय उत्पादक, शेतकरी गट,प्रक्रियाउद्योग आणि निर्यातदारांसाठी हे प्रदर्शन एक प्रभावी मंच ठरत असून,यामुळे भारतीय उत्पादने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यास मदत होत आहे.परिणामी निर्यात वाढीस चालना मिळून शेतकरी व उद्योजकांच्या उत्पन्नात वाढ होण्याचा मार्ग मोकळा होत आहे.
याबाबत खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटले की, बीड जिल्ह्यासारख्या ग्रामीण भागात कृषी आधारित व अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी अशा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांचे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरते. आधुनिक तंत्रज्ञान, जागतिकदर्जाचे पॅकेजिंग, विपणन पद्धती आणि निर्यातीच्या संधी यांची माहिती या प्रदर्शनातून मिळत असल्याने ग्रामीण भागातील युवक उद्योजकांना नवे उद्योग सुरू करण्याची प्रेरणा मिळते.
ग्रामीण भागात अन्नप्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास स्थानिकपातळी वर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, शेतमालाला योग्य भाव मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त होईल.तसेच युवकांना स्वावलंबी बनण्याची संधी मिळून स्थलांतरालाही आळा बसेल,असेही म्हटले आहे. या प्रदर्शनातून मिळणारा अनुभव,संपर्क आणि माहिती निश्चितच ग्रामीण उद्योग विकासासह देशाच्या आर्थिक प्रगती साठी मोलाची ठरणार असल्याचा विश्वास खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.



