

केज/प्रतिनिधी
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा कार अपघातात झालेला मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून,त्यांच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.दि.९ एप्रिल गुरुवार रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास रेणापूर फाट्या जवळ हा अपघात झाला होता.
मात्र,घटनास्थळा वरून राकेश गिड्डे यांचा लॅपटॉप,टॅब आणि मोबाईल यांसारख्या महत्त्वाच्या वस्तू बेपत्ता असल्याने हा संशय बळावला आहे.मयताचे बंधू अक्षय गिड्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी सोबत असणारे त्यांचे मित्रही तेव्हापासून बेपत्ता असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.शव विच्छेदन अहवालात त्यांच्या सातही बरगड्या तुटल्याचे आणि डोक्याला मार लागून अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी कुटुंबीय दि.२१ एप्रिल नंतर रेणापूर पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करणार आहेत.दरम्यान, राकेश गिड्डे अंबाजोगाई येथे बदलीसाठी प्रयत्नशील होते.त्यासाठी त्यांनी आमदार नमिताताई मुंदडा यांच्याकडून शिफारस पत्रही घेतले होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान या अपघाता विषयी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून या अपघाताची चौकशी करून सत्यता समोर आली पाहिजे अशी मागणी केली जात आहे.



