सामाजिक

पहिल्याच पावसात केजचा कळंब रोड जलमय! कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर साचले घाण पाणी;नगर पंचायत की मेगा कंपनी? जबाबदारी कोणाची?

केज/प्रतिनिधी

मान्सूनपूर्व पहिल्याच पावसाने केज शहरातील कळंब रोडवरील मुख्य रस्त्याची अक्षरशः दुरवस्था केली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अवघ्या एकाच पावसाने प्रशासकीय नियोजनाचे वाभाडे काढले असून, नालीचे सर्व घाण पाणी आणि चिखल थेट मुख्य रस्त्यावर आल्याने पादचारी व वाहन धारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.या परिस्थितीमुळे नालेसफाई झालीच नाही का?असा संतप्त सवाल नागरिक विचारत असून, हे अपयश नगर पंचायत चे की रस्त्याचे काम करणाऱ्या मेगा कंपनीचे, असा वाद आता रंगू लागला आहे.

पहिल्याच पावसात तारांबळ,रस्ते झाले डबके

कळंब रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक, शेतकरी आणि वाहनांची मोठी वर्दळ असते.मात्र, झालेल्या पावसानंतर बाजार समितीच्या कमानी जवळ रस्त्यावर प्रचंड प्रमाणात पाणी साचले आहे.रस्त्या कडेला असलेल्या नाल्या उपसल्या न गेल्याने किंवा त्यांचा प्रवाह बंद असल्याने दूषित पाणी थेट रस्त्यावर पसरले आहे.रस्त्यावर साचलेले पाणी आणि त्यात तरंगणारा कचरा यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

बाजार समिती समोर चिखलाचे साम्राज्य

केज कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आपला शेतीमाल घेऊन येत असतात.मात्र, प्रवेशद्वाराजवळच गुडघाभर पाणी आणि काळा चिखल साचल्याने शेतकऱ्यांना बाजारात येणे कठीण झाले आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोरही पाणी साचल्याने त्यांच्या व्यवसायावर याचा थेट परिणाम झाला आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या बांधकाम साहित्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास आणखी अडथळा निर्माण होत असल्याचे चित्रात स्पष्ट दिसत आहे.

जबाबदारी कोणाची? नगर पंचायत की मेगा कंपनीची?

पावसाळा तोंडावर असताना शहरात नाल्या पुर्ण होऊन नालेसफाई होणे अपेक्षित होते.मात्र, या मुख्य रस्त्यावरील नाले सफाई झालीच नसल्याचे या दृश्यावरून सिद्ध होते.यावरून आता केज नगर पंचायत आणि रस्ता रुंदीकरण व देखभालीचे काम करणारी ‘मेगा कंपनी’ यांच्यात संशयाचे वातावरण आहे.

नागरिकांचा सवाल

नगर पंचायतने पावसाळ्यापूर्वी नाले सफाईची मोहीम कागदावरच राबवली काय? की कंपनीचे दुर्लक्ष? मेगा कंपनीने रस्त्याचे काम करताना पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य भुयारी गटारांची व्यवस्था केली नाही का?या प्रकरणी

एकमेकांकडे बोट दाखवण्याच्या या कारभारामुळे सामान्य जनता मात्र वेठीस धरली जात आहे.त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. पहिल्याच पावसात जर ही अवस्था असेल,तर ऐन पावसाळ्यात या रस्त्यावरून चालणेही अशक्य होईल. प्रशासनाने तात्काळ या पाण्याचा निचरा करावा आणि नाल्या साफ कराव्यात,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी दिला आहे.आता या प्रकरणी केज नगर पंचायत प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार कंपनी खडबडून जागी होऊन तात्काळ उपाययोजना करणार का,याकडे केजवासीयांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!