कृषीसामाजिक

केज तालुक्यात अवकाळीचा धुमाकूळ ; मांगवडगाव-साळेगाव शिवारात सोलार पॅनल सह आंब्यांचे मोठे नुकसान,शेतकऱ्यांवर ओढवले आर्थिक संकट पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी

केज/प्रतिनिधी

बुधवार दिनांक १३ मे रोजी केज तालुक्यामध्ये झालेल्या अचानक वादळी पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः मांगवडगाव आणि साळेगाव शिवारा तील शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा जबरदस्त तडाका बसला असून,शेतातील लाखो रुपयांचे सोलार पॅनल उडून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की,अनेक शेतकऱ्यांनी वीज पंपासाठी शेतात बसवलेले सोलार पॅनल उखडून फेकून दिले गेले. यामुळे पॅनलच्या काचा फुटून व लोखंडी स्ट्रक्चरचे वाकडे होऊन मोठे नुकसान झाले आहे.

आंब्याच्या बागांनाही फटका

या वादळी पावसामुळे केवळ सोलार पॅनलचेच नव्हे,तर परिसरातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचेही कंबरडे मोडले आहे.काढणीला आलेला आंबा झाडा वरून गळून पडल्याने बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. वर्षभर कष्ट करून हाती येणारा घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

शासकीय योजनेतून आणि पदरचे पैसे खर्च करून शेतात सोलार पॅनल बसवले होते, जेणेकरून विजेचा प्रश्न सुटेल.पण एकाच वादळाने सर्व काही उद्ध्वस्त केले.आता पुन्हा उभे कसे राहायचे, हा मोठा प्रश्न आहे.

बाधित शेतकरी, मांगवडगाव शिवार.

तालुक्यात झालेल्या या अतोनात नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत असून, प्रशासनाने तातडीने मांगवडगाव आणि साळेगाव शिवारातील नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी,अशी मागणी परिसरातून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!