
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील गप्पेवाडी परिसरामध्ये महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.येथील बाराभाई वस्तीत अनेक ठिकाणी वीजतारा कमालीच्या खाली लोंबकळत असून,या गंभीर समस्येकडे महावितरणचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.या पार्श्वभूमीवर गप्पेवाडी तील संतप्त ग्रामस्थांनी केजचे तहसीलदार श्री. अशोक भंडारे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
महावितरण उपकेंद्राचा निष्काळजीपणा
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात महावितरण उपकेंद्र विडा यांच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.विडा उपकेंद्राच्या निष्काळजी पणामुळे गप्पेवाडी आणि विशेषतः बाराभाई वस्तीत विजेच्या तारा जमिनीलगत लोंबकळत आहेत.यामुळे शेतात काम करणारे शेतकरी, नागरिक आणि पाळीव जनावरांना विजेचा धक्का लागून मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी महावितरण विभागाकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रारी केल्या,मात्र संबंधित विभागाने याकडे सपशेल दुर्लक्ष करत कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही.प्रशासनाच्या या ढिसाळ विकास कामां बद्दल सध्या नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण आहे.
पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची मागणी
सध्या उन्हाळा संपत आला असून लवकरच पावसाळा सुरू होणार आहे.पावसाळ्याच्या दिवसांत हवेतील ओलसरपणामुळे आणि वादळवाऱ्यामुळे या लोंबकळणाऱ्या तारांमुळे मोठा अनर्थ किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही —गप्पेवाडी ग्रामस्थ
त्यामुळे महसूल प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा,महावितरणला आदेश देऊन या धोकादायक वीजतारांची तात्काळ पाहणी व दुरुस्ती करावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
या निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केवळ वीज तारा दुरुस्त करण्याचीच नाही,तर वारंवार तक्रार करूनही कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही गप्पेवाडीतील ग्रामस्थांनी दिला आहे.यावेळी गप्पेवाडी परिसरातील अनेक प्रमुख नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.



