प्रशासकीयसामाजिक

केज नगरपंचायत दलित वस्ती सुधार योजनेत कोट्यवधींचा गैरव्यवहार ? फुलेनगर सभागृह प्रकरणी चौकशीची मागणी ; आंदोलनाचा इशारा

केज/प्रतिनिधी

केज नगर पंचायत अंतर्गत दलित वस्ती सुधार योजना सन २०१७-१८ व २०२०-२१ मधील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.या संदर्भात मा.मुख्याधिकारी,नगर पंचायत केज यांना निवेदन देत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, विविध विकास कामां साठी शासनाकडून सुमारे रु.२ कोटी ७७ लाख १८ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला होता.मात्र संबंधित कामांमध्ये आर्थिक गैर व्यवहार झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.विशेषतः वार्ड क्र.७ फुलेनगर,केज येथे सभागृह बांधकामासाठी रु.२४ लाख ९५ हजार निधी मंजूर करण्यात आला होता.संबंधित सभागृहासाठी टेंडर प्रक्रिया देखील पूर्ण झाली होती.परंतु प्रत्यक्षात सभागृहाचे बांधकाम झाले नसतानाही निधी उचलण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

याच ठिकाणी आता पुन्हा सुमारे रु.४० लाख खर्चाचे नवीन सभागृह मंजूर करून त्यासाठी वर्कऑर्डर तयार करण्यात येत असल्याची माहिती समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

तसेच लॉकडाऊनच्या काळात घरकुल घोटाळ्यातील निधी इतर एजन्सीकडे वळविण्यात आल्याप्रमाणेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतील निधीही गैर मार्गाने वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.सदर प्रकरणातील सर्वकामांची तात्काळ चौकशी करून नवीन सभागृहाच्या कामास स्थगिती द्यावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच,या प्रकरणाची लवकरात लवकर निष्पक्ष चौकशी करून योग्य कारवाई करण्यात आली नाही,तर फुलेनगर भागातील एल.एफ.सी. चौक येथे लोकशाही मार्गाने आमरण उपोषण आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला आहे.या निवेदनासोबत तीन प्रशासकीय मान्यता आदेशांच्या प्रती तसेच सभागृहाचे टेंडर झाल्या बाबतचे पुरावे जोडण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!