जिवाचीवाडी येथील खंडेश्वरी मंदिर रस्ता कामात गैरव्यवहाराचा आरोप ; चौकशीची ग्रामस्थांची मागणी

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील जीवाचीवाडी परिसरा तील खंडेश्वरी मंदिराकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.या संदर्भात गटविकास अधिकारी, पंचायत समिती केज यांच्याकडे लेखी अर्ज सादर करण्यात आला असून संबंधित कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार,जीवाचीवाडी येथील ग्रामस्थ बाबासाहेब काशिनाथ चोरे यांनी पंचायत समिती कार्यालयात दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की,खंडेश्वरी मंदिराकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यासाठी आमदार फंडातून सुमारे आठ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे व अपूर्ण अवस्थेत असल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, संबंधित कामात बोगस बिले उचलण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने शासन निधीचा अपव्यय झाल्याचा संशयही ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.रस्त्याचे काम दर्जाहीन झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून ग्रामस्थांनी याबाबत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
अर्जात पुढे म्हटले आहे की,गावातील अनेक विकास कामांमध्येही अशाच प्रकारे गैरप्रकार झाल्याची चर्चा असून शासनाच्या पैशांचा योग्य वापर होत नसल्याचे चित्र दिसत आहे.त्यामुळे संबंधित कामाची प्रत्यक्ष पाहणी करून दोषी अधिकारी,संबंधित संस्था व कंत्राटदारांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी या प्रकरणाची चौकशी पंचायत समिती स्तरावर न करता स्वतंत्र समिती मार्फत करण्याची मागणी केली असून, चौकशी दरम्यान गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
तसेच चौकशी अहवाल सार्वजनिक करण्याची मागणीही पुढे आली आहे.या अर्जाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी बीड,उपमुख्य कार्यकारी अधिकारी बीड,जिल्हाधिकारी बीड तसेच विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता प्रशासकीय पातळीवर गांभीर्याने घेतलेजाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान,संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.मात्र ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



