मराठवाडा विभागात शेकाप पक्ष विस्ताराची जबाबदारी आता केजचे भाई मोहन गुंड यांच्या खांद्यावर,अनेक वर्षे चळवळीचा अनुभव प्रचंड जनसंपर्क असणारा आक्रमक चेहरा शेकापने दिला

केज/प्रतिनिधी
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा मराठवाडा एकेकाळी बालेकिल्ला होता. मराठवाड्याने शेकापला दिग्गज नेते दिले.यामध्ये धाराशिवचे विरोधी पक्ष नेते,खासदार स्वातंत्र्य सेनानी भाई उध्दवराव पाटील,माजी खासदार भाई ॲड.नरसिंगराव काटीकर,परभणीचे आमदार भाई अण्णासाहेब गव्हाणे, नांदेडचे माजी खासदार, आमदार भाई डॉ. केशवराव धोंडगे, अहमदपूरचे माजी मंत्री किसनराव देशमुख, परभणीचे माजी खासदार शेषराव देशमुख, तुळजापूरचे माजी आमदार माणीकराव खपले, परभणीचे भाई लक्ष्मणराव नाना गोळेगावकर,कळंबचे माजी आमदार कुंडलिकराव घोडके, निलंग्याचे माजी आमदार भाई श्रीपतराव साळुंके, औसाचे माजी आमदार भाई मल्लनाथ गुंडनाथ आप्पा,कंधारचे माजी आमदार गुरुनाथ कोरडे, गंगाखेडचे माजीआमदार भाई ज्ञानोबा गायकवाड, बीडचे जनार्दन तुपे, परतुरचे भाई माजी बारकुले या नेत्त्यांसह शेकडोवर आक्रमक झुंजार कार्यकर्त्यांची स्थानिक पातळीवर काम करणारी शेकापची मोठी फळी मराठवाड्यामध्ये होती.अलीकडच्या काळात भांडवली, जातीय गलिच्छ राजकिय समीकरणात चळवळी पासुन तरूण दुरावत गेले,पक्षाचेमराठवाड्यात बोटावर मोजण्याइतकेच लोक पक्षात उरले आहेत. अशा परिस्थितीत प्रचंड जनसंपर्क असणारा आक्रमक आंदोलनातील चेहरा म्हणून ओळख असणारे शेकापचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई मोहन गुंड यांच्यावर दौरे करुन बांधणीची जबाबदारी देण्यात आल्यामुळे मराठवाड्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
मराठवाडा विभागातील पक्ष संघटन बांधणीसाठी पुर्ण वेळ काम करणारे भाई मोहन गुंड यांच्यावर जबाबदारी द्यावी अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांची होती,त्या अनुषंगाने पक्षाचे सर चिटणीस मा.आमदार भाई जयंत पाटील यांच्या आदेशान्वये मराठवाडा विभागाची जबाबदारी भाई मोहन गुंड यांच्यावर सोपवण्यात आली असल्याची माहिती शेकाप पक्षाचे कार्यालयीन चिटणीस भाई ॲड.राजेंद्र कोरडे यांनी या संदर्भातील पत्र भाई मोहन गुंड यांना दिले आहे.
या पत्रानुसार मराठवाडा विभागात पक्षाचा दौरा आयोजित करून ग्राम,तालुका व जिल्हा स्तरावर पक्ष संघटन करणे अपेक्षित आहे,पक्ष विस्तारासाठी समित्यांची स्थापना करणे, पदाधिकाऱ्यांची निवड करणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी जनसंघटना आघाड्याची स्थापना करून त्यावर पदाधिकारी नेमण्याचे अधिकार ही भाई मोहन गुंड यांना देण्यात आले आहेत.केलेल्या कामाचा सविस्तर अहवाल वेळोवेळी मध्यवर्ती कार्यालयात पाठवण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत.
या निवडीमुळे मराठवाड्यात शेतकरी कामगारांच्या प्रश्नांवर शेकाप अधिक आक्रमक पणे काम करेल,अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.भाई मोहन गुंड हे चिटणीस मंडळाचे सदस्य असून अत्यांत चिकाटीने जिद्दीने प्रामाणीकपणे काम करणारा चेहरा म्हणुन त्याची मराठवाड्यात ओळख आहे.अनेक शेतकरी कामगाराचे यशस्वी आंदोलने त्यांच्या नावावर आहेत,सक्रीय चळवळीतील अनुभवाचा फायदा पक्ष कार्यकर्त्यांना होईल असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.मराठवाडा विभागा सह राज्यभरातून भाई मोहन गुंड यांचं अभिनंदन करण्यात येत आहे,मात्र पुन्हा शेतकरी कामगार पक्ष मराठवाड्यामध्ये उभा करणे हे त्यांच्या समोरील मोठं आव्हान असणार आहे हे मात्र नक्की.
मे मध्ये मराठवाड्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे,पूर्ण विभागा मध्ये तालुका दौरे करून जुन्या नव्याकार्यकर्त्यांची सांगड घालून प्रत्येक तालुक्यामध्ये कमिटी स्थापन करून,शेतकरी कामगाराच्या प्रश्नावर शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता प्रत्येक तालुक्यात मराठवाड्या मध्ये शेकापचे कार्यकर्ते आग्रही भूमिका घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी काम करतील या साठी मी स्वतः लक्ष घालणार आहे प्रत्येक गावात गावात शेकापचे विचार पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई मोहन गुंड यांनी व्यक्त केले आहे.



