
बीड/ प्रतिनिधी
बीड-लातूर-धाराशिव स्थानिक प्राधिकरण विधान परिषद मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस कडून संभाव्य उमेदवार म्हणून अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू आणि जनसामान्यांमध्ये मजबूत संपर्क असलेले रमेश आडसकर यांचे नाव सध्या जोरदार चर्चेत आले आहे.
पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य,तिन्ही जिल्ह्यांतील मजबूत जनसंपर्क आणि सर्व पक्षीय स्नेहसंबंध या बळावर रमेश आडसकर यांना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी द्यावी,अशी मागणी कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांमधून पुढे येत आहे.स्वर्गीय अजितदादा पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या रमेश आडसकर यांनी गेली तीन दशके जिल्हा परिषद राजकारणा पासून ते सहकार आणि शिक्षण क्षेत्रापर्यंत सातत्याने काम करत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.स्वर्गीय लोकनेते मा.आ. बाबुरावजी आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बंधू मेघराज आडसकर यांच्या सहकार्याने त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्याची भक्कम पायाभरणी केली.
रमेश आडसकर यांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे लोकांशी असलेला थेट संवाद. कोणतेही मोठे पद नसतानाही सामान्य माणसांची कामे पूर्णत्वाकडे नेण्याची त्यांची कार्यशैली आजही ग्रामीण भागात चर्चेचा विषय आहे. माजलगाव, केज,परळीसह बीड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये त्यांचा प्रभाव असून धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यापर्यंत त्यांनी शैक्षणिक कार्याचा विस्तार केला आहे.
बदलत्या शैक्षणिक पद्धतीनुसार ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने त्यांनी सीबीएसई पॅटर्नच्या इंग्रजी शाळा सुरू करत शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. पन्नासहून अधिक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.त्यामुळे सहकारा सोबत शिक्षण क्षेत्रातही त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण मानले जाते.मागील विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नव्हते.
त्या निवडणुकीत महायुती च्या पाठबळावर भाजपचे सुरेश धस यांनी विजय मिळवत राष्ट्रवादीच्या पारंपरिक मानल्या जाणाऱ्या जागेवर कब्जा केला होता.त्यामुळे यंदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. विशेषतः स्वर्गीय अजितदादा पवार यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार असावा अशी भूमिका घेतली होती.मात्र ते स्वप्न अपूर्ण राहिले.आता त्याच स्वप्नाला पूर्णत्व देण्यासाठी सक्षम आणि सर्वमान्य चेहरा म्हणून रमेश आडसकर यांच्या कडे पाहिले जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते,बीड-लातूर-धाराशिव या तिन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थां मध्ये महायुतीचे संख्याबळ प्रभावी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील समन्वय साधला गेला तर रमेश आडसकर यांचा विजयाचा मार्ग अधिक सुकर होऊ शकतो. विशेष म्हणजे उप मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार या मराठवाड्याशी भावनिक नाळजुळलेल्या नेत्या म्हणून पाहिल्या जातात.त्यामुळे त्यांनी मराठवाड्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आडसकरां सारख्या जमिनीवर काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी द्यावी,अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.
केज मतदारसंघ हा आडसकर कुटुंबियांचा प्रभाव असलेला भाग मानला जातो.तसेच परळी,माजलगाव, गेवराई या भागांमध्येही त्यांचे मजबूत संपर्क आहेत.भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याशी असलेले स्नेहसंबंध आणि विविध पक्षांतील स्थानिक नेत्यांशी असलेले सौहार्दपूर्ण संबंध हे देखील त्यांच्या उमेदवारीसाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.
रमेश आडसकर यांचे पुतणे तथा अंबासहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश आडसकर यांनीही मागील काही वर्षांत युवकांमध्ये मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे.त्यामुळे आडसकर कुटुंबाचा वाढता सामाजिक आणि राजकीय प्रभाव या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो,असे जाणकारांचे मत आहे.
बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण हे देखील आडसकर यांच्या कार्यशैलीशी परिचित आहेत.पक्षनिष्ठा,संघटन क्षमता आणि सर्व सामान्यांमधील स्वीकारार्हता लक्षात घेता त्यांनीही पक्षश्रेष्ठींकडे आडसकरांच्या नावा साठी सकारात्मक भूमिका घ्यावी,अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
एकंदरीत बीड-लातूर- धाराशिव या तिन्ही जिल्ह्यांच्या राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक समीकरणांचा विचार करता रमेश आडसकर यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी मिळू शकते,अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.आता सुनेत्राताई पवार यांचा निर्णय काय होणार याकडे तिन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.



