भिंतीपत्रकातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव ;आदर्श विद्यालयात जयंतीनिमित्त प्रेरणादायी उपक्रम

केज/प्रतिनिधी
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बनसारोळा येथे भिंती पत्रक उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.या उपक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि लेखन कौशल्याचा उत्कृष्ट नमुना सादर करत विविध विषयांवर सुंदर व माहितीपूर्ण लेख तयार केले.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शैलीत सादर केलेले हे लेख आकर्षक सजावटीसह भिंतीपत्रका वर प्रदर्शित करण्यात आले.या भिंतीपत्रकाचे अनावरण ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पठाण मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.काकडे बालासाहेब सर तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
या उपक्रमासाठीविद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष रोकडे सर यांनी मार्गदर्शन केले.त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी दर्जेदार आणि आशयपूर्ण लेखन सादर केले.भिंतीपत्रक उपक्रमामुळे विद्यार्थ्यां मध्ये वाचन-लेखनाची आवड वाढीस लागून त्यांच्या सर्जनशीलतेला नवे व्यासपीठ मिळाले आहे.
भिंतीपत्रक स्पर्धेत सर्वच लेख उत्कृष्ट होते. त्यामधून प्रथम क्रमांक अपूर्वा अशोक पारेकर, द्वितीय क्रमांक साधना ज्ञानेश्वर स्वर्णकार तर तृतीय क्रमांक अपूर्वा अविनाश काळे यांनी पटकावला.विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेचे आदर्श शिक्षक जगन्नाथ काळे सर हे बक्षिसे देणार आहेत अशी माहिती संतोष रोकडे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.



