
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील बनसारोळा येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विशेष वाचन उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले सकाळी साडेआठ ते दुपारी दीड वाजेपर्यंत चाललेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.त्यानंतर बुद्ध वंदना घेतली.यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या लेखनाच्या भिंतपत्रकाचे अनावरण करण्यात आले.पुढे विद्यार्थ्यांनी कादंबऱ्या, लेख व विविधसाहित्याचे वाचन करत ज्ञानसाधनेत स्वतःला रमवले.प्रत्येक विद्यार्थी आपल्या वाचनात तल्लीन झालेला दिसत होता,हे या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक काकडे बी.के.सर यांची उपस्थिती लाभली.तसेच शिक्षकवृंदामध्ये रोकडे एस.व्ही,मांदळे सर, लोखंडे सर,कापसे सर आणि काळे सर हे उपस्थित होते.विशेष म्हणजे शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत वाचन करून या उपक्रमाला प्रेरणादायी स्वरूप दिले.
या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे महामानवाची जयंती केवळ औपचारिक न राहता ती ज्ञानार्जनातून साजरी व्हावी हा होता. शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला.खऱ्या अर्थाने,वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणेच या उपक्रमाने विद्यार्थ्यां मध्ये वाचनाची आवड निर्माण करत ज्ञानाची खरी दिशा दाखवली.



