गुन्हेगारी

आमच्या वंशाला दिवा नाही म्हणत छळलं, विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

केज/प्रतिनिधी

तुला तीन मुलीच झाल्या आमच्या वंशाला दिवा नाही,अशी सतत हिणवणूक करत शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागत असल्याने अरुणा उद्धव ठोंबरे नामक २५ वर्षीय विवाहितेने फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील उंदरी येथे घडली.या प्रकरणी पती, सासू व सासऱ्यांविरोधात युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यातील आजरखेडा ता.रेणापूर येथील प्रकाश सूर्यवंशी यांची मुलगी अरुणा हिचा विवाह १६ ऑगस्ट २०१९ रोजी केज तालुक्यातील उंदरी येथील उद्धव ठोंबरे याच्याशी झाला होता. विवाहाच्या वेळी उद्धव ठोंबरे बँकेत नोकरीस होता, मात्र नंतर त्याने नोकरी सोडून शेती व्यवसाय सुरू केला.या दाम्पत्याला राजनंदिनी वय ५ तसेच आर्या व अपूर्वा वय ४ अशा जुळ्या मुलींसह एकूण तीन मुली आहेत.तीन मुली झाल्याच्या कारणावरून पती उद्धव ठोंबरे दारूच्या नशेत अरुणाला शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. तसेच सासू इंदूबाई ठोंबरे व सासरे उत्तम ठोंबरे हे आम्हाला मुलगा हवा होता तू आमचा वंश बुडविलास, असे म्हणत तिला मानसिक त्रास देत होते.या छळाबाबत अरुणा ठोंबरे हिने वेळोवेळी आई-वडील, भाऊ गोविंद सूर्यवंशी तसेच मोठी बहीण करुणा यांना फोनवरून तसेच माहेरी आल्यानंतरमाहिती दिली होती.सासरच्या छळामुळे तिला सासरी नांदण्याची इच्छा नसल्याचे ती वारंवार व्यक्त करीत होती.मात्र माहेरच्या मंडळींनी तिची समजूत काढून तिला धीर देण्याचा प्रयत्न केला.

अखेर सततच्या छळाला कंटाळून अरुणा ठोंबरे हिने १० जानेवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजता उंदरी येथील राहत्या गळफास घेऊन आत्महत्या केली.या प्रकरणी मयत अरुणाचा भाऊ गोविंद सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात पती उद्धव ठोंबरे, सासू इंदूबाई ठोंबरे व सासरे उत्तम ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक भारत बरडे हे पुढील तपास करीत आहेत.आईच्या अकाली जाण्याने तिन्हीचिमुकल्या मुलींचे भवितव्य उघड्यावर आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!