तहसीलदार साहेब घोंगडं झटकू नका ग्रामसेवक कॉलनी केज येथील ओपन स्पेस मधील अतिक्रमणे तात्काळ काढा-प्रा.ईश्वर मुंडे

केज/प्रतिनिधी
प्लॉटींग करणे व खोटे नाटे कागदपत्रे तयार करून ओपन स्पेस विकण्याचा गोरख धंदा बीड जिल्ह्यात चालू आहे.या बाबतचा तारांकित प्रश्न बीड चे आ.संदीप क्षीरसागर यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात उचलून धरला होता.शासनाने त्या बाबत एक चौकशी समीती नेमली आहे. असाच प्रकार केज येथे ही होत आहेत.बीड जिल्ह्यातील सर्वाधिक रेडी रेकनर शासन दर असलेली व कलेक्टर बीड मंजूर एन.ए.तसेच टाऊन प्लॅनर,बीड मंजूर ले-आऊट असलेली जिल्हापरिषद कर्मचारी यांची ग्राम सेवक कॉलनी श्री दत्त गृह निर्माण सहकारी सोसायटी,केज च्या ओपन स्पेस वर सध्या भू माफीयांची नजर पडलेली असून अतिक्रमणे करून फसवेगिरीने विक्री करणे चालू आहे.
सदरील अतिक्रमणे तात्काळ काढावेत अन्यथा तेथील रहीवाशांना सोबत घेऊन दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी तहसील कार्यालय केज येथे निदर्शने केली जातील असे लेखी निवेदन प्रा.ईश्वर मुंडे व इतरांनी तहसीलदार केज, मुख्याधिकारी,नगर पंचायत,केज व तालुका निरीक्षक,भूमीअभिलेख,केज यांना दि.२१ जुलै २०२५ रोजी दिले होते.
ओपन स्पेस चे भूखंड सांभाळणे व त्याचा सार्वजनिक वापरासाठी विकास करणे शासनाचे कर्तव्य आहे.याविषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार केज यांनी जाय मोक्यावर जाऊन पंचनामा करून अतिक्रमणे काढून भू माफियांना चपराक देणे आवश्यक होते.
परंतू तसे न करता फक्त मुख्याधिकारी,नगर पंचायत,केज यांना दि.३० जुलै २०२५ रोजी कार्यवाही करणे बाबतचे पत्र पाठवून आपल्या अंगावरचे घोंगडं झटकण्याचे काम तहसीलदार केज यांनी केले आहे. यावर आपले समाधान नसून अतिक्रमणे काढले नाहीत तर आपण आपल्या आंदोलन करण्याच्या भुमिकेवर ठाम असल्याचे प्रा.ईश्वर मुंडे व इतरांनी माध्यम प्रतिनिधींना सांगीतले आहे.



