
बीड/प्रतिनिधी
सद्यस्थितीत देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमी वर काही ठिकाणी इंधन टंचाई निर्माण झाल्याच्या अफवा पसरत आहेत. मात्र बीड जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेलचा साठा समाधानकारक प्रमाणात उपलब्ध असून इंधन पुरवठा सुरळीत सुरू आहे.अफवांमुळे नागरिकांकडून इंधन साठवणुकीसाठी गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर अनावश्यक रांगा लागत आहेत. ही परिस्थिती टाळण्यासाठी नागरिकांनी घाबरून जाऊन इंधन खरेदी करू नये,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक व इंधन कंपन्यांच्या विक्री अधिकारी-प्रतिनिधींना प्रशासनामार्फत इंधन पुरवठा नियमित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती साठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.चुकीची माहिती पसरविणाऱ्यां विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले आहे.



