
केज/प्रतिनिधी
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत भाऊ तुपकर हे सरसकट कर्जमाफी व पीकविमा नुकसान भरपाईसाठी दि.१५ जून पासून बुलढाणा येथे “बेमुदत अन्नत्याग” आंदोलनाला बसले आहेत.या आंदोलनाच्या समर्थनार्थ मंगळवारी केज येथे शेतकऱ्यांनी सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी आज दि.१६ जून रोजी मंगळवारी सकाळी ११-३० वाजता तहसील कार्यालय,केज येथे धडक देऊन प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार श्री.शुभम पवार यांना १० प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले.निवेदनानंतर तहसील कार्यालयासमोर टायर जाळून निषेध निवेदन दिल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या समोरच टायरमध्ये फसव्या जीआरची प्रत जाळून सरकारचा तीव्र निषेध नोंदवला.यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आज टायर जाळले,उद्या खुर्ची जळेल – कुलदीप करपे यांचा गंभीर इशारा
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे म्हणाले की,आज आम्ही तहसीलसमोर टायर जाळले.सरकारने वेळीच दखल नाही घेतली तर उद्या सरकारची खुर्ची जळायला मागेपुढे शेतकरी बघणार नाहीत. रविकांत भाऊ उपाशी आहेत आणि सरकार जीआरच्या नावाखाली फसवणूक करतंय.हे शेतकरी सहन करणार नाही.
आज होळ येथे चक्काजाम
दि.१७ जून २०२६ बुधवार सकाळी १० वाजता बीड-अंबाजोगाई -लातूर महामार्गावर होळ,ता.केज येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
निवेदनातील 10 प्रमुख मागण्या
- सरसकट विनाअट, विनाशर्थ कर्जमुक्ती करावी,
- खरीप २०२५ चा हेक्टरी ₹१७,५०० पीकविमा नुकसान भरपाई द्यावी
- मे २०२६ च्या वादळात केळीचे १००% नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी,
- उमरी (केज) टोल नाक्यावर स्थानिक वाहनांना टोल माफी द्यावी,
- तालुक्यातील प्रलंबित पांदण,शेत-रस्ते, बांध रस्ते तात्काळ खुले करावेत,
- खत,बि-बियाणे यांचा काळाबाजार थांबवून शासकीय दराप्रमाणे लिंकिंग न करता उपलब्ध करावे,
- शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी अखंड ८ तास उच्च दाबाने विना खंड वीजपुरवठा करावा,
- महाडीबीटी द्वारे ऑन लाईन पात्र झालेल्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, ठिबक तुषारसिंचनासाठी पूर्वसंमती तात्काळ द्यावी
- गाय गोठा,विहिरी, घरकुल योजनेत पात्र लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान वाटप करावे,
- २०२५-२६मधील ऊस गाळप हंगामातील निर्धारित FRP नुसार थकीत ऊस बिल तात्काळ वाटप करावे
यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे,केज तालुकाध्यक्ष दिलीप लोंढे,युवा तालुकाध्यक्ष अतुल गवळी,सतिश भाऊशिंदे, हरिभाऊ आघाव,दिंगबर तपसे, सुनील कापरे, भारत धपाटे,सुग्रीव करपे, उमेश गायकवाड, दत्तात्रय चाळक,दादासाहेब गुंड, शहाबुद्दीन शेख,इमरान कुरेशी,अण्णा पौळ, अजय कांबळे,मुखीद शेख,अमोल चौधरी, भारत जाधव आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.



