
केज/प्रतिनिधी
बीड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात खा.बजरंग सोनवणे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून उमेदवारी मिळवून ती लढाई संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या लढाईवर स्वार होऊन निवडणूक जिंकली सुद्धा पण ही खासदार होण्याची लढाई म्हणावी तेवढी सोपी नक्कीच नव्हती कारण समोर अत्यंत तगडा उमेदवार म्हणून पंकजा मुंडे उभ्या होत्या.परंतु मराठा आरक्षणाचा मुद्दा व काँग्रेस, शिवसेना यांच्या सह मित्रपक्षांनी केलेले काम यामुळे अवघड असणारी लढाई बजरंग सोनवणे जिंकले व खासदार झाले.
ही लढाई करत असताना त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व त्यांच्याच गावचे सुपुत्र असणारे राहुल सोनवणे यांना केज येथे शिवनेरी बंगल्यावर काँगेसच्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यासमोर व खा. रजनीताई पाटील यांच्या समोर शब्द दिला होता की,भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत तुम्हाला संधी असेल तिथे मी मदत करेन.आता खा.बजरंग सोनवणे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असणारे राहुल सोनवणे यांचे सारणी गाव युसुफ वडगाव जिल्हा परिषद गटात असून हा गट सर्वसाधारण असून लोकसभा निवडणुकीत दिलेल्या शब्दाप्रमाणे खा.बजरंग सोनवणे हे राहुल सोनवणे यांना मदत करून आघाडी धर्म पाळतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे कारण बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरव सोनवणे यांनी या गटाचे गावदौरे सुरू करून आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत.
आता खा. बजरंग सोनवणे स्वतःच्या लोकसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळतात की पुत्रप्रेमापोटी शब्द फिरवतात हे येणाऱ्या काळात दिसून येईलच मात्र आजपर्यंतचा खा.बजरंग सोनवणे यांचा राजकीय इतिहास पाहता ज्यांनी ज्यांनी त्यांना त्यांच्या राजकीय जीवनात मदत केली त्यांना धोका देतात हा इतिहास खा.बजरंग सोनवणे यांना मोडीत काढायचा असेल तर त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असणाऱ्या व ज्यांनी लोकसभा निवडणुकीत जीवाचे रान करून आघाडी धर्म पाळला त्या राहुल सोनवणे यांना युसुफ वडगाव जिल्हा परिषद गटाची जागा सोडून देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांच्याच सारणी गावच्या गावकरी लोकांचे म्हणणे आहे.
खा.बजरंग सोनवणे यांनी लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर भाषणात सांगितले होते की,माझ्या कुटुंबातील आता कोणीही जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपरिषद लढणार नाही.यापुढे कार्यकर्त्याना संधी देऊन पदे दिली जातील.आता येणारा काळ ठरवेल की कार्यकर्ता की पुत्रप्रेम ?
खासदार जर स्वतःचा मुलगा,बायको,मुलगी यांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी देऊन पुढे आणणार असतील तर कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का? हा सवाल सर्वपक्षीय कार्यकर्ते विचारत आहेत. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत देखील नेत्यांचीच मुले पुढे येणार असतील तर कार्यकर्त्यांनी देखील आशा नेत्यांना त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया उमटत आहे.



