केज नगरपंचायतीत घरकुल अनुदानाचा ४ कोटींचा डल्ला;अतिरिक्त पदभाराच्या नावाखाली प्रशासक राजवटीत लूट! १५५ धनादेशांद्वारे ४ कोटी २४ लाखांचे नियमबाह्य वाटप | एसआयटी (SIT) चौकशीचे आदेश | मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

केज/प्रतिनिधी
केज नगरपंचायतीमध्ये पंतप्रधान आवास योजने च्या(घरकुल)निधीत तब्बल ४ कोटी ३६ लाख रुपयांचा महाघोटाळा समोर आला आहे. गोरगरिबांच्या हक्काचे घरकुल अनुदान लाभार्थी ऐवजी कंत्राटदार आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या खिशात घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, विशेष म्हणजे हा संपूर्ण काळाबाजार प्रशासक राजवट असताना आणि अतिरिक्त पदभार असलेल्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने झाला आहे.
नेमका घोटाळा काय?
म्हाडाकडून केज नगर पंचायतीला ३७४ लाभार्थ्यांच्या घरांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला होता.नियमानुसार हा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जाणे अपेक्षित होते.मात्र, चौकशीत असे समोर आले की,केवळ ११६ लाभार्थ्यांना १ कोटी ६७ लाख रुपयांचे वाटप झाले.उर्वरित ४ कोटी २४ लाख रुपये तब्बल १५५ धनादेशांद्वारे इतरत्र नियमबाह्य पद्धतीने वळवण्यात आले.यामध्ये तांत्रिक कर्मचाऱ्यांचे वेतनही नियमबाह्यरीत्या याच निधीतून काढण्यात आले.
स्वाक्षऱ्यांचा खेळ आणि अधिकारांचा गैरवापर
या घोटाळ्यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या अधिकाऱ्यांकडे त्या काळात पदभार नव्हता, त्यांनीही धनादेशांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
१.मिलिंद सावंत (तत्कालीन जिल्हा प्रशासन अधिकारी) : यांच्या कार्यकाळात ८८ धनादेशांद्वारे २ कोटी ६५ लाख ७० हजार ९४९ रुपये वितरित झाले. विशेष म्हणजे,सचिन देशपांडे यांच्याकडे पदभार असतानाही सावंतांच्या स्वाक्षरीचे ७८ धनादेश वटले.
२.नीता अंधारे (तत्कालीन जिल्हा प्रशासन अधिकारी) : यांच्या स्वाक्षरीने ६७ धनादेशांद्वारे १ कोटी ५९ लाख २ हजार २७४ रुपयांचे वितरण झाले. अशोक साबळे मुख्याधिकारी असताना अंधारेंनी ३६ धनादेशांवर स्वाक्षऱ्या केल्या.
विधानसभेत पडसाद ; एसआयटी चौकशीची घोषणा
केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी हिवाळी अधिवेशनात याघोटाळ्या बाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी हा घोटाळा मान्य करत, याची चौकशी SIT (विशेष तपास पथक) मार्फत आणि आर्थिक गुन्हे शाखेमार्फत (EOW) करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना एका आठवड्यात अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
‘अर्धे तुझे,अर्धे माझे’ : भ्रष्टाचाराचे परफेक्ट प्लॅनिंग
प्राथमिक चौकशीनुसार, अधिकारी,कर्मचारी, कंत्राटदार आणि काही स्थानिक पुढाऱ्यांनी मिळून ‘अर्धे तुझे आणि अर्धे माझे’ या सूत्राने हा निधी लाटला आहे. गोरगरिबांच्या घरांचे स्वप्न धुळीस मिळवून स्वतःचे खिसे भरणाऱ्या या टोळी तील अनेक ‘मोठे मासे’ आता एसआयटीच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चौकशी समितीचा फास आवळला :
उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे,जयंत तळीखेडे,प्रकाश कुंभार, रविकांत करडे आणि अंकुश देशमुख यांची समिती सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, लवकरच मोठा फौजदारी गुन्हा दाखल होण्याची चिन्हे आहेत.



