सांगवी सारणी येथील नाभिक समाजातील तरुणाने ओबीसी आरक्षण जाईल या नैराश्यातून गळफास घेऊन केली आत्महत्या

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील सांगवी सारणी येथील नाभिक समाजातील युवकाने ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण जाईल या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
अशोक नारायण भंडारे वय ३८ वर्षे असे या दुर्दैवी घटनेतील मृताचे नाव असून त्यांच्या अकस्मात जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अशोक भंडारे हे सांगवी येथील रहिवासी असून नाभिक समाजातील होते.काही दिवसांपासून त्यांच्या मनात समाजाला मिळालेले ओबीसी आरक्षण जाते की काय ही भावना सुरू होती अशी माहिती मिळाली आहे.त्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते. शनिवारी सकाळी शेतावर गेलेल्या अशोक यांनी शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
सदर घटनेची माहिती मिळताच केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी उप जिल्हा रुग्णालयात पाठवला.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अशोक यांच्या पश्चात पत्नी,आई,एक भाऊ आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.