भय इथले संपत नाही अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न असफल,मुलीने आरडा ओरड केल्याने अपहरण कर्ता झाला पसार

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील जिवाचीवाडी परिसरात ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचे दुचाकीवरून अपहरण करण्याचा धक्कादायक प्रयत्न घडला आहे.बुधवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून मुलीच्या प्रसंगावधानामुळे तिची सुटका झाली.मिळालेल्या माहितीनुसार,पीडित मुलगी आपल्या वडिलांना जेवण देऊन घराकडे परत येत होती.
त्यावेळी दुचाकी वरून आलेल्या अज्ञात इसमाने तिला रस्त्यात अडवले.तिच्या वडिलांची चौकशी करून,त्यांच्या कडे पैसे आहेत असे सांगत,त्यांना भेटण्याच्या बहाण्याने मुलीला विश्वासात घेतले. तत्पश्चात तिच्या नाकाजवळ पावडरचा वास देत तोंड दाबून जबरदस्तीने दुचाकीवर बसवले व अपहरण केले.
अपहरणकर्ता मुलीला जीवाचीवाडी वरून लव्हूरी, कानडीमाळी मार्गे केज कडे घेऊन येत असताना कानडी रोड लगतच्या वीटभट्टीजवळ मुलीने आरडाओरडा केला.त्यामुळे घाबरून अपहरणकर्ता मुलीला रस्त्यात सोडून दुचाकी वरून पसार झाला.
यानंतर मुलगी पायीच केज बसस्थानकावर आली.येथे तिच्या नातेवाईक महिलेची भेट झाल्यानंतर तिच्या वडिलांना संपर्क साधण्यात आला.तत्काळ मुलीच्या वडिलांनी केज पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.सदर प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक सोनवणे अधिक तपास करीत आहेत.
अपहरणकर्त्याने ज्या मार्गावरून मुलीला नेले त्यावरील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत आरोपीची दुचाकी व हालचाली कैद झाल्या आहेत.सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे आरोपीला लवकरच अटक केली जाईल,असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.



