स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेमध्ये भारत मातेच्या स्तुतीचा गौरव दिन ‘ वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन, जगण्याची मूल्य खऱ्या अर्थाने भारतात आहेत- शशिकांत गव्हाणे

केज/प्रतिनिधी
आद्यमहत्व देशाला व नंतर स्वकर्माला द्यावे- ह.भ.प.केशव महाराज शास्त्री
जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर माध्यमिक विभाग या शाळेच्या प्रांगणामध्ये श्रीमंत सरदार महादजी शिंदे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था केजच्या संयुक्त विद्यमाने दि.७ नोव्हेंबर २०२५ वार शुक्रवार रोजी भारतमाते च्या स्तुतीचा गौरव दिन ‘वंदे मातरम’ या गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त सामूहिक गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून ह.भ.प.केशव महाराज सारूक शास्त्री,भगवान श्रीकृष्ण आश्रम केज हे उपस्थित होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून शशिकांत गव्हाणे,भारतीय किसान संघ मराठवाडासमन्वयक यांनी उपस्थिती दर्शवली. इतर उपस्थित मान्यवरां मध्ये सुनील केंद्रे,गट शिक्षणाधिकारी केज, व्ही.एम नागरगोजे,गट विकास अधिकारी पंचायत समिती केज, जी.बी.गदळे,सचिव, जीवन विकास शिक्षण मंडळ केज,ए.पी.आय. मांजरमे साहेब, बाळासाहेब अहंकारे साहेब,पोलीस स्टेशन केज,ह.भ.प.विष्णु महाराज शास्त्री,हनुमंत घाडगे, शैलाताई इंगळे, अध्यक्षा शालेय व्यवस्थापन समिती, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे,गणेश कोकीळ मु.अ.स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल. प्राचार्य शंकर भैरट,ज्येष्ठ पत्रकार गौतम बचुटे, एकनाथ गोरे,धनराज पुरी,मुसळे सर,रोडेवाड सर,मुंडे सर,विनोद गुंड तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर तसेच स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रामराव पाटील विद्यालय, सरस्वती कन्या प्रशाला, स्व.प्रमोद महाजन कनिष्ठ महाविद्यालय केज या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी ‘वंदे मातरम’ या गीताचे सामूहिक गायन केले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेतील सांस्कृतिक विभागप्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी”शब्द सुमने अंतकरणे अतिथींना वंदूनी करितो स्वागत मंगलदिनी” या गीताने केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक आय.टी.आय. केज येथील शिक्षक शिंदे सर यांनी केले.पुढे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी वंदे मातरम लघु नाटिका सादर केली. यामध्ये सूर्यवंशी आदित्य,जाधव संस्कृती,चाटे आरती, शिंदे अमृता,क्षीरसागर सिद्धी हेविद्यार्थी सहभागी होते. या नाटिकेने सर्वांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शशिकांत गव्हाणे यांनी याप्रसंगी बोलताना म्हणाले की,भारतातील स्वातंत्र्यसैनिक,संत यांचे कर्तृत्व,नेतृत्व आणि जगणं हेच भारतीयांना दिशादर्शन करणार आहे, भारतमातेचे सुपुत्र संत एकनाथ महाराज म्हणतात की,’भरतखंडी नवदेहप्राप्ती ही तव परम भाग्याची संपत्ती’ या उक्ती प्रमाणे भारतभूमीत जन्म घेण्यासाठी भाग्यच असावे लागते.त्याग, समर्पण,चारित्र्य, परोपकार,कृतज्ञता, सत्शील अशी कित्येक मूल्ये हा भारत शिकवतो. बंकिमचंद्र चटोपाध्याय यांचं ‘वंदे मातरम्’ हे गीत भारताच्या स्वत्वाचंच समर्ग दर्शन आहे.’अपि सवर्णमयि लंका लक्ष्मण में रोचते । जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयासे।।’ या ओळीतून रामही सांगतात की, जन्मभूमी हीच स्वर्गाहून श्रेष्ठ असते.
‘वंदे मातरम्’ हा मंत्र जणू जगण्या मरण्याची प्रेरणा देणारा आहे.म्हणून भारतमाता आपल्या जगण्यात उतरली पाहिजे. जातीवाद भाषावाद,प्रांतवाद मतभेद असे सर्व भेदाभेद बाजूला ठेवन भारतमाते प्रती समर्पण भावना जागृत व्हायला मदत करणारा मंत्र म्हणजे ‘वंदे मातरम्’ १९०५ ची बंगालची फाळणी थांबवणाराही हाच मंत्र आहे.अगाध देशभक्ती, स्वातंत्र्याची आस आणि वंदे मातरम हा मंत्र भारताला अखंड स्वातंत्र्य मिळवून देणारे आहेत.
रामप्रसाद, बिसमिल्लाह,चंद्रशेखर आझाद,भगतसिंग, राजगुरू,सुखदेव अशा अनेक स्वातंत्र्यसैनिकांना देशाप्रती जाणीव देणारा ‘वंदे मातरम’ हाच मंत्र आहे. ज्या कादंबरीत चटोपाध्याय यांनी ‘वंदे मातरम हे गीत लिहिले ती ‘आनंदमठ’ कादंबरी प्रत्येकाने वाचावी असा संदेश याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अध्यक्षीय समारोपात ह.भ.प.केशव महाराज शास्त्री म्हणाले की,भारत शब्दातील ‘भा’ म्हणजे ज्ञान आणि ‘रत’ म्हणजे रमणारे अर्थातच ज्ञानाच्या प्रकाशात रमणारे म्हणजे भारतीय आहेत.प्रत्येकाने समोरच्याप्रती आदरभाव ठेवावा.
भगवंता प्रमाणेच समोरच्या व्यक्तीला योग्य वागणूक द्यावी.आद्य महत्त्व अगोदर देशाला व नंतर स्वकर्माला द्यावे. आपणा सर्वांना देशासाठी च जगायचं आहे आणि देशासाठीच मरायचं आहे’ असा विश्वास त्यांनी बालमनी रुजवला. विचार बदलला तर जीवन बदलायला वेळ लागत नाही. शेवटी ते म्हणाले की,भारत हा कर्मप्रधान देश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी केले तर आभार शिंदे सर यांनी मानले.



