अध्यात्मिकसांस्कृतीक

केज शहरात लक्ष्मीपूजना चा उत्साह घरोघरी व व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये चोपडीपूजनाची धामधूम

केज/प्रतिनिधी

केज शहरात दिपावली सणाचा सर्वाधिक मंगल आणि श्रद्धेचा दिवस असलेला लक्ष्मीपूजनाचा सोहळा मोठ्या भक्ति भावाने आणि उत्साहात पार पडला.कार्तिक अमावस्येच्या या दिवशी घरोघरी तसेच व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये देवी लक्ष्मी चे विधीवत पूजन करून पारंपरिक रितीरिवाजा नुसार चोपडी पूजन करण्यात आले.

दिवाळी सणातील हा दिवस आर्थिक समृद्धीचा आणि शुभारंभाचा प्रतीक मानला जातो.या दिवशी व्यापारी बांधवांनी आपल्या जुन्या वह्या, खातेवही,हिशोबाच्या चोपड्या पूजन करून नव्या आर्थिक वर्षाचा शुभारंभ केला. बलीप्रतिपदा,म्हणजेच दिवाळी पाडवा,या दिवसापासून व्यापाऱ्यांचे नवीन वर्ष सुरू होते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चोपडीपूजनाला विशेष धार्मिक आणि व्यावसायिक महत्त्व आहे.

केज शहरातील मुख्य बाजारपेठ,मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ,जय भवानी चौक,बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक,कानडी रोड, समर्थ नगर,वकीलवाडी भागातील तसेच विविध व्यापारी संकुलांमध्ये दिवे, फुलांचे तोरण,आणि रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक प्रतिष्ठानांनी आपल्या गुरुजींकडून विधीवत पूजन करून देवी लक्ष्मी,भगवान विष्णू आणि कुबेर यांची प्रार्थना केली.आरती नंतर उपस्थितांना प्रसादाचे वितरण करण्यात आले, तर सर्वच ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून उत्साहाने लक्ष्मी पुजन व दिवाळीचे स्वागत करण्यात आले.

लहान मुलांनी फटाके फोडत आनंद साजरा केला,तर महिलांनी पारंपरिक पोशाखात लक्ष्मीमातेची आरती करून “समृद्धी, सुख आणि शांती लाभो” अशी प्रार्थना केली.केज शहरात दिवाळीचा हा मुख्य सोहळा शांततेत, उत्साहात आणि ऐक्याच्या वातावरणात पार पडल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.एकूणच,केज शहरात लक्ष्मीपूजन, चोपडीपूजन आणि दिवाळीचा उत्सव पारंपरिक श्रद्धा,आनंद आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!