
मुंबई /प्रतिनिधी
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती साठी थेट नगराध्यक्ष निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील २४७ नगर परिषदांबरोबरच १४७ नगरपंचायतीं च्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण निश्चित करण्याची सोडत सोमवार,दि.६ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात काढण्यात येणार आहे. दिवाळीचा उत्साह ओसरताच या निवडणुका जाहीर होण्याची चिन्हे असल्या मुळे राज्यातील नगर राजकारणात चैतन्य निर्माण झाले आहे.
थेट जनतेतून निवड
यंदा प्रथमच नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार आहे.यापूर्वी नगर सेवकांमधून नगराध्यक्षाची निवड केली जात होती.मात्र राज्य सरकारच्या निर्णयानंतर नागरिकांना आपला नगराध्यक्ष थेट मतदानातून निवडण्याचा अधिकार मिळणार आहे.त्यामुळे या निवडणुका अधिक चुरशीच्या, रंगतदार आणि थेट उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वावरआधारित होणार आहेत.
सोडतीतून आरक्षण स्पष्ट
६ ऑक्टोबर च्या सोडती तून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, भटक्या-विमुक्त तसेच महिलांसाठी राखीव जागांचे वाटप निश्चित केले जाईल.राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही प्रक्रिया पार पाडली जाणार असून, पारदर्शकतेसाठी सर्व राजकीय पक्ष आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दिवाळीनंतर राजकीय रणशिंग
दिवाळीनंतर लगेचच नगरपरिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राज्यातील शेकडो शहरांमध्ये राजकीय हालचालींना वेग येईल.उमेदवारांची निवड ,गटबाजी ,जातीय समीकरणे आणि स्थानिक पातळीवरील राजकीय दबाव या सर्व घटकांमुळे निवडणुका तापणार आहेत.
पार्श्वभूमी आणि वाद
नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणावरून मागील काही काळात राज्यात मोठे वाद झाले.अनेक ठिकाणी न्यायालयीन प्रक्रिया, समाजघटकांचा दबाव आणि महिलां साठी असलेल्या आरक्षणाच्या टक्केवारी वरून गोंधळ निर्माण झाला होता. काही नगर पंचायतींमध्ये निवडणुका रखडण्याची वेळही आली होती. त्यामुळे यंदाची सोडत ऐतिहासिक ठरणार आहे.
पक्षीय समीकरणे
काँग्रेस ,भाजप ,राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना शिंदे गट , शिवसेना (उबाठा गट) ,मनसे आणि स्थानिक आघाड्या या सर्व पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.थेट नगराध्यक्ष निवडणुकी मुळे पक्षीय संघटनां सोबतच स्थानिक नेत्यांच्या लोकप्रियतेची खरी परीक्षा लागणार आहे.
नागरिकांचा उत्साह
थेट निवडणुकीच्या निर्णयामुळे नागरिकां मध्ये उत्सुकता आणि उत्साह वाढला आहे. गावोगावी आपला नगराध्यक्ष कोण? या चर्चांना उधाण आले आहे. सामाजिक कार्यकर्ते, तरुण, व्यावसायिक अशा नव्या चेहऱ्यांनाही आता राजकारणात संधी मिळू शकते.