
केज/प्रतिनिधी
श्री.साईनगरी शिर्डी येथे रविवार दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी साई पालखी निवारा येथे बी दि चेंज फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला.या सोहळ्यात राज्यातील अनेक गुणी व कार्यक्षम शिक्षकांचा त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
शिक्षक हेच समाजाची आदर्श पिढी घडवणारे शिल्पकार असून,त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याच्या हेतूने फाउंडेशन तर्फे दरवर्षी या पुरस्काराचे आयोजन केले जाते.यावर्षीचा हा मानाचा सोहळा शिर्डीत पार पडला. सदरील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगरचे खासदार डाॅ.श्री.सुजय विखे पाटील,श्री.विठ्ठल राव जपे पाटील,श्री. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गोरक्ष गाडीलकर, श्री. स्वरूप कापे,श्री.निखिल वामन व श्री.दीपक चव्हाण तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.मयूर ढोकचौळे व विश्वस्त श्री. अभिषेक तुपे ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री.रत्नेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टोकवाडी ता.परळी.वै. जि.बीड या उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा.श्री.रमेश ज्ञानोबा सरवदे सर यांना शिक्षण क्षेत्रातील,संगीतक्षेत्रातील ,सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच सामाजिक क्षेत्रा तील उल्लेखनीय योगदानाबद्दल आणि विविध स्तरावर अनेक आदर्श विद्यार्थी घडविल्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२५ हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
त्यांच्या कार्याची दखल घेत समाजातील विविध स्तरातून त्यांचे कौतुकहोत असून ते संगीत अध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या श्री.सोमेश्वर शिक्षण संस्था जिरेवाडी ता.परळी वैजनाथ जि.बीड या संस्थेचे अध्यक्ष श्री.गोवर्धन कांदे व संस्थेचे सचिव अँड.श्री. गोपाळराव कांदे, विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.प्रदीप मुंडे सर, सहकारी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनीही अभिनंदन केले.राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२५ च्या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला अधिकचे महत्त्व येवून भविष्य काळासाठी प्रेरणादायी अधिष्ठान प्राप्त झाले आहे.