गुत्तेदाराच्या ढिसाळ कारभारामुळे लाईटचा लोखंडी पोल अंगावर पडल्याने नाव्होलीच्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील नाव्होली गावातील सर्वोपरीचीत शेतकरी बाबासाहेब बिक्कड (सावकार) यांच्या अंगावर गुत्तेदाराच्या ढिसाळ कारभारामुळे लाईटचा लोखंडी पोल पडून त्यांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली असुन त्यांच्या निधनाने नाव्होली गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील नाव्होली येथील व्यवसायाने शेतकरी असणारे बाबासाहेब दादाराव बिक्कड वय अंदाजे ५५ वर्ष हे दि.२ ऑक्टोबर २०२५ गुरुवार रोजी दसरा सणादिवशी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गावातुन नांदूर केज रस्त्याने आपल्या घरी येत होते.त्याच दिवशी सकाळपासूनच गावापासून ते बाबासाहेब दादाराव बिक्कड हे रहात असलेल्या येडझनी वस्ती पर्यंत महावितरण कंपनीचे राजेगाव सब स्टेशन अंतर्गत गावठाण सिंगलफेज लाईटचे लोखंडी पोल रोवण्याचे काम गुत्तेदारामार्फत सुरू होते.सांयकाळी अंदाजे ५ वाजण्याच्या सुमारास बाबासाहेब बिक्कड हे गावाकडून येडझनी वस्तीवर असलेल्या आपल्या घराकडे येत होते.मात्र वाटेतच पोल रोवत असलेले पाहून रोडवर त्यांनी आपल्या शेतातुन काढून आणलेल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्या जवळ काही वेळ ऊभे राहिले.
असताना त्या ठिकाणी रोवण्यासाठी आणलेला लोखंडी पोल रोडच्या या बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे नेत असताना ट्रॅक्टरला लोखंडी साखळीने लटकलेल्या पोलची साखळी तुटली आणि वर लटकलेला लोखंडी पोल रस्त्याच्या कडेला आपल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्याजवळ उभे असलेले बाबासाहेब दादाराव बिक्कड यांच्या डोक्यात पडला त्यात त्यांच्या डोक्याला पायाला गंभीर मार लागल्याने त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला हि घटना सायंकाळी घडल्याने आणि त्या दिवशी दसरा सण असल्याने सिमोलंघना च्या तयारीत असणारे सारे गाव मृत्यूचीमाहिती मिळताच स्तब्ध झाले.
त्यामुळे गावात सिमोलंघन झालेच नाही रात्रीची वेळ असल्याने त्यांचे शवविच्छेदन दुसऱ्या दिवशी सकाळी झाल्याने त्यांच्या पार्थिवावर दि.३ ऑक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी १वाजता त्यांच्या शेतात हजारोच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ आप्तेष्ट, मित्रपरिवार,सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रा तील चाहते अंत्यविधी साठी उपस्थित होते.
बाबासाहेब बिक्कड यांना सावकार या नावाने सर्वत्र ओळखले जात होते.त्यांचा चाहता वर्ग मोठा होता.तसेच त्यांना धार्मिक वारकरी सांप्रदायिक कार्याची खुप आवड होती.या त्यांच्या जाण्याने नाव्होली गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात भाऊ,पत्नी चंद्रकला,दोन मुले बालाजी आणि प्रदिप तर मुलगी सुरेखा (विवाहित)जावाई,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.