प्रशासकीय

मांजरा धरणाचे दोन दरवाजे 0.25 मिटरने उघडले नियंत्रित पाणी विसर्ग सुरू,नदीकाठ च्या नागरिकांनी सतर्क राहावे प्रशासनाचा इशारा

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचला असून दि.१३ सप्टेंबर २०२५ दुपारी १६.१५ वाजेपर्यंत प्रकल्पातील जलसाठा ९९.२१ टक्के इतका झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरूच आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने आज दुपारी नियंत्रित पाणी विसर्ग सुरू केला आहे.

प्रकल्प प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १६.१५ वाजता धरणातील क्रमांक १ आणि ६ वक्रद्वारे प्रत्येकी ०.२५ मीटर उंचीने उघडण्यात आले असून, मांजरा नदीपात्रात एकूण १,७४७.१४ क्यूसेक्स (४९.४८ क्यूमेक्स) इतक्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. ही विसर्गाची सुरुवातीची पातळी असून धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ किंवा घट केली जाणार आहे. दरम्यान, प्रशासनाने नदीकाठा वरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुरनियंत्रण कक्षाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या सूचनेत, नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे,कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये.

जिवीत अथवा वित्तहानी टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे असे आवाहन करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांत प्रकल्प परिसरात आणि पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.त्यामुळे प्रशासन धरणातील पाणी पातळी सतत लक्षात ठेवून नियंत्रित विसर्ग करून नदीकाठावरील गावांना इशारे देत आहे.

तज्ज्ञांच्या मते,येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाचे प्रमाण वाढू शकते.यामुळे नदीकाठा वरील गावांनी प्रशासनाशी संपर्कात राहून सुरक्षित स्थळी स्थलांतराची तयारी ठेवावी,असा सल्लाही तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!