

धारूर/प्रतिनिधी
किल्ले धारूर शहरातील विविध प्रलंबित नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्या तात्काळ सोडवण्यासाठी नगर परिषदेचे मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी/मुख्याधिकारी यांना नुकतेच एक सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.याप्रसंगी शहरातील प्रमुख नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या सोयीसाठी प्रशासनाने खालील प्रमुख १४ मागण्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या
स्मारकांची देखभाल व सुरक्षा
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कायमस्वरूपी शिडीची व्यवस्था,विद्युत रोषणाई व रक्षक कठडे बसवणे; तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथेही विद्युत रोषणाई करणे.
पाणीपुरवठा सुधारणा व गळती रोखणे
शिनगारे गल्ली,मोठा चौक व इतर भागात विस्कळीत असलेला पाणीपुरवठा सुरळीत करणे आणि पाणी वाया जाऊ नये म्हणून सार्वजनिक नळांना तोट्या बसवणे.
वाहतूक,सुरक्षा व सीसीटीव्ही
मुख्य रस्त्यांवर गतिरोधक बसवणे आणि शहरातील मुख्य व संवेदनशील ठिकाणी तात्काळ सिसीटीव्ही कॅमेरे बसवणे.
रस्ते दुरुस्ती व अडथळे दूर करणे
नवीन पाईपलाईनच्या कामामुळे खराब झालेले रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करणे,तसेच रहदारीला अडथळा ठरणारे विजेचे व टेलिफोनचे खांब हटवणे.
धोकादायक इमारती व स्वच्छता
पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई करून डास प्रतिबंधक फवारणी व अबेटिंग करणे,तसेच धोकादायक घरांचे व इमारतींचे तात्काळ सर्वेक्षण करणे.
इतर मागण्या-
हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण,राजमाता जिजाऊ महाविद्यालय ते डॉ.आंबेडकर चौका पर्यंतचे पथदिवे रात्री सुरू ठेवणे,मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे,मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे आणि नागरिकांसाठी उद्यान, क्रीडांगण व वॉकिंग ट्रॅक विकसित करणे.
मान्यवरांची उपस्थिती
हे निवेदन सादर करताना संदीप शिनगारे,पवन धोत्रे,रोहित गायकवाड, प्रशांत शिनगारे,ॲड. युवराज फुन्ने,दादा शेरकर व रोहित फावडे आदि मान्यवर उपस्थित होते. प्रशासनाने यामागण्यांची दखल घेऊन पावसाळ्या पूर्वी शहरातील नागरी कामे तात्काळ मार्गी लावावीत,अशी आग्रही मागणी या वेळी उपस्थित मान्यवरांनी केली आहे.



