उभ्या जगाचा पोशिंदा थेंब घामाचे गाळतो, भरण्या जगाचे पोटं उभा संसार जाळतो, कळमआंबा येथे कवी संमेलन रंगले


केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील कळमआंबा येथे शहावली दर्गा उरूस व गुढीपाडवा निमित्त यात्रा महोत्सव संपन्न झाला.
शुक्रवार रोजी कवि संमेलन संपन्न झाले.कवी गोरख शेंद्रे,कवी जनार्धन सोनवणे,कवी राजेश रेवले,कवी विक्रम डोईफोडे,कवी पवन खरात,कवी डॉ.हनुमंत सौदागर,कवी विशरद पठाण आदी कवींनी बहारदार कविता सादर केल्या.शेतीमातीच्या, निसर्ग,समाज,विविध विषयांवरील कवितांना रसिकांनी दाद दिली.
गोरख शेंद्रे यांनी समाजभान जागवणारी “वाचीत जाय पुस्तक वाचीत जाय समाज,निळ्या,भगव्या बरोबर पाडीत जा नमाज रंगाच्या रंगाच्या भेदामध्येच बरबाद झाल्या पिढ्या उगाच कुणाच्या भानगडीत पडू नको येड्या” ही कविता सादर केली.
डॉ.हनुमंत सौदागर यांनी शेती मातीची कविता सादर करून “उभ्या जगाचा पोशिंदा थेंब घामाचे गाळतो,भरण्या जगाचे पोटं उभा संसार जाळतो” शेतकऱ्यांचे कष्ट डोळसपणे उभा केले. तर तिर्रकस मधून सध्या बुवा बाबांकडून होत असलेले शोषण मांडताना ज्योतिषी,भोंदूबाबा कडून भक्तीचे सूत जुळले जाते,जाळ्यात ओढून महिलांना रात्रंदिवस छळले जाते हे सादर करून सामाजिक भाष्य केले. कवी राजेश रेवले यांनी माय कवितेतून “माय घराचा उंबरा माय अंगणी तुळस, बापाच्या मंदीराची माय असते कळस ” ही कविता सादर आईची महती उभा केली.पवन खरात यांनी गझल सादर करताना “काय करावे जगताना मी,तेच नेमके समजत नाही स्वप्न बघू की जिम्मेदारी,तेच नेमके समजत नाही सांडून जा ढगा रे,थोड्या तरी सरी तू उरलाय काळजाचा कोराच सातबारा” शेतकरी जीवनाच्या व्यथा उभा केल्या.विक्रम डोईफोडे यांनी शेतकरी जीवनावर भाष्य करणारी ‘आम्हा कुनब्याच्या भाळी लिहीलस काय, अजब तुझा न्याय नभा अजब तुझा न्याय”
ही कविता सादर केली कवी जनार्धन सोनवणे यांनी “बघा बबा जमतं का ते अन मन आपलं रमतं का ते “ही सामाजिक भाष्य करणारी कविता सादर केली. विशरत पठाण चमचे सांभाळा,ऑफिसातले काम असो वा लग्ना सारखा.. सोहळा.करतील सगळा खेळ बाबांनो चमचे सांभाळा यांनी कविता सादर करून रसिकांची मने जिंकल बाबासाहेब जाधव यांनी ए जिंदगी ही कविता सादर केली.
कार्यक्रमास इब्राहिम चाचा पठाण,शिवाजी सावंत ,प्रदिप इंगळे, सरपंच शशिकांत इंगळे उपसरपंच दिगंबर वाघमारे जिजाबापू टोंपे , सतीश टोंपे,आश्विन टोंपे, विसरत पठाण, तुळशीदास वाघमारे, आलिफ शेख,मेहबुब पठाण आदींची उपस्थिती होती.सूत्रसंचालन बाबा जाधव,आभार प्रदर्शन युवराज हिरवे यांनी केले.कवी संमेलनास महिला पुरुष विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



