राज्य महिला आयोगा च्या अध्यक्षपदी डॉ.सौ. सीताताई बनसोड यांची नियुक्ती करावी – सिद्धार्थ शिनगारे

केज/प्रतिनिधी
राज्य महिला आयोगा च्या अध्यक्षपदी डॉ.सौ. सीताताई बनसोड यांची नियुक्ती करावी अशी मागणी सिद्धार्थ शिनगारे यांनी केली आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की, त्या बीड जिल्ह्यातील केज नगर पंचायतीच्या सध्या नगराध्यक्षा असून आंबेडकरी चळवळीत गेल्या अनेक वर्षांपासून सक्रियपणे कार्य करत आहेत.महिलांवरील अन्याय,अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, सामाजिक भेदभाव या विषयांवर काम करण्याचा त्यांना जवळपास वीस वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव आहे.
त्या सध्या सुनेत्राताई अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटात कार्यरत आहेत. सामाजिक प्रश्नांची जाण, संघटन कौशल्य,आणि महिलांच्या प्रश्नांवर काम करण्याचा अनुभव या सर्व बाबी लक्षात घेता त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदा साठी योग्य उमेदवार ठरू शकतात.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करताना केवळ राजकीय समतोल न पाहता महिलांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम केलेल्या,महिलांवरील अन्याय-अत्याचार प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करून न्याय मिळवून देण्याचा अनुभव असलेल्या,समाजात कामाची ओळख असलेल्या महिलेची नियुक्ती होणे अत्यंत आवश्यक आहे.राज्य महिला आयोग हे केवळ सन्मानाचे पद नसून महिलांना न्याय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी असलेले पद आहे.
त्यामुळे अध्यक्ष पदावर सामाजिक कार्य,महिला प्रश्न, कायदे, प्रशासन, संघटन कौशल्य आणि जनतेशी संपर्क असलेली महिला असणे गरजेचे आहे.विशेषतः वंचित, मागास, अनुसूचित जाती -जमाती,ग्रामीण भागातील महिलांवर होणारे अन्याय मोठ्या प्रमाणात असतात. त्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेली आणि तळागाळात काम केलेली महिला अध्यक्ष झाल्यास महिला आयोग अधिक प्रभावीपणे काम करू शकतो.राज्य महिला आयोग मजबूत करायचा असेल,तर अध्यक्षपदावर कार्यकर्ती,लढवय्या आणि महिलांसाठी काम केलेली महिला बसली पाहिजे,हीच अपेक्षा आहे.
आजपर्यंत अनुसूचित जातीतील महिलेला राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद मिळालेले नाही.त्यामुळे डॉ.सौ.सीताताई बनसोड यांच्या नियुक्तीमुळे अनुसूचित जातीतील तसेच वंचित घटकांतील महिलांना न्याय मिळवून देण्यास मदत होऊ शकते.या सर्व बाबींचा विचार करून सुनेत्रा ताई पवार यांनी डॉ.सौ. सीताताई बनसोड यांची राज्य महिलाआयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी सिद्धार्थ शिनगारे संस्थापक अध्यक्ष भारतीय हितकारिणी संघ यांनी केली आहे.



