केज शहरामध्ये तात्काळ रक्तदान शिबिराचे आयोजन,रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ इंडिया यांची सामाजिक हाक

केज/प्रतिनिधी
अंबेजोगाई येथील शासकीय रक्तपेढीत सध्या रक्ताच्या युनिट्सचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याची गंभीर परिस्थिती समोर आली आहे.विविध आजारांवर उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांना तातडीने रक्तपुरवठा करण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचे सामाजिक आवाहन करण्यात येत आहे.केज तालुक्यातील बहुसंख्य रुग्णांचे उपचार अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयातच होत असल्यामुळे परिस्थिती अधिक गांभीर्याची बनली आहे.
या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ केज च्या वतीने सोमवार,दि.३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हनुमान मंदिर, वकीलवाडी,केज येथे तात्काळ (इमर्जन्सी) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.समाजहिताच्या या उपक्रमात सर्वनागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
“रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून,एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात.त्यामुळे अधिकाधिक जणांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे आणि इतरांनाही प्रेरित करावे,” असे रोटरी क्लबचे पदाधिकारी यांनी सांगितले.“रक्तदान-जीवनदान आणि जीवनदान देण्याचा मान प्रत्येक समाजप्रेमी नागरिकाने अभिमानाने जपावा,” असेही ते म्हणाले.
या उपक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ केजचे अध्यक्ष रो.सत्यवान राऊत मो.९६२३६१४०००, सचिव रो.प्रवीण देशपांडे मो.९४२००३१५५५, प्रोजेक्ट चेअरमन रो. जितेंद्र देवधारे,प्रोजेक्ट को-चेअरमन रो.अनिकेत पाटील व संस्थापक अध्यक्ष रो.हनुमंत भोसले मो.९४२३७३३८८८ यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
शिबिरासाठी आवश्यक वैद्यकीय पथक, सुरक्षितता उपाययोजना आणि रक्त संकलनाची सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
केज शहरातील सामाजिक संस्था,तरुण मंडळे व सर्व समाजप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन “समाजाचे खरे दाते व आधार”असल्याची जाणीव करुन द्यावी,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



