
केज / प्रतिनिधी
चार लाख रूपयांची रक्कम पिशवीत ठेवून दुचाकीवरून गावाकडे निघालेल्या ऊसतोड मुकादमाच्या हातातील ती रक्कम अन्य एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून नेली. खळबळ उडवून देणारी ही घटना दि.२९ जुलै रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास केज उपजिल्हा रुग्णालयाजवळ घडली.
याबाबत उत्तरेश्वर उत्तम धायगुडे (रा. मानेवाडी ता. केज) यांनी केज ठाण्यात फिर्याद नोंदविली. ते त्यांचे मेहुणे रमेश वैजनाथ माने याने त्यांना देण्यासाठी अंबाजोगाई येथील एका बँकेतून चेकद्वारे काढलेले चार लाख रूपये घेऊन केज येथे आले होते. उत्तरेश्वर धायगुडे यांच्यासोबत त्यांचा मेव्हणा रमेश माने आणि पुतण्या अशोक धायगुडे हे तिघे दुचाकीवरून चार लाखांची रक्कम कॅरिबॅगमध्ये घेऊन केज येथे आले होते. ती रक्कम त्यांना आरटीजीएसद्वारे कोल्हापुर येथील शिरोली एमआयडीसीमधील एका इंजिनिरींग वर्कसच्या खात्यावर नवीन ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉली खरेदीसाठी पाठवायचे होती. परंतु त्यांना केजला यायला उशीर झाल्याने बँकेचा व्यवहार बंद झाल्यामुळे ते तिघे दुचाकीवरुन त्यांच्या गावी मानेवाडीकडे जाण्यासाठी निघाले. ते तिघे अंबाजोगाई रोडने जात असताना उपजिल्हा रुग्णालय केजपासून २०० मीटर अंतरावर असताना त्यांच्या पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीवरील २५ ते २६ वयोगटातील दोघांनी उत्तरेश्वर धायगुडे यांच्या हातातील चार लाख रुपये असलेली कॅरिबॅग हिसकावून घेत अंबाजोगाई रस्त्याने दूचाकीवर धुम ठोकली. यावेळी उत्तरेश्वर धायगुडे यांनी आरडाओरड करुन त्या त्यांचा दोन कि मी पर्यंत पाठलाग केला, पण ते त्यांना सापडले नाहीत. या प्रकरणी धायगुडे यांच्या फिर्यादीवरून केज ठाण्यात दोन अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दरम्यान शहरात मुख्य चौकात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आधारे पोलिस तपास करीत आहेत. लवकरच हे आरोपी ताब्यात येतील. असे केज ठाणे निरीक्षक स्वप्नील उनवणे म्हणाले.

