सामाजिक

मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, खा.बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बाळासाहेब विखे-पाटील यांना थेट पत्र,रखरखत्या उन्हात सुरू असलेल्या आंदोलनावरून वेधले सरकारचे लक्ष

बीड/प्रतिनिधी

मराठा समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने संघर्ष करणारे मनोजदादा जरांगे – पाटील यांनी कालपासून रखरखत्या उन्हात पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे.त्यांच्या या आंदोलनामुळे राज्यातील कोट्यवधी मराठा बांधवां मध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून,राज्य सरकारने आता कोणताही वेळ न दवडता यावर तातडीने आणि सकारात्मक तोडगा काढावा,अशी मागणी बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी केली आहे.यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उप समितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांना थेट पत्र पाठवून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

खा.बजरंग सोनवणे यांनी पत्रात म्हटले आहे की,मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मनोज दादा जरांगे-पाटील हे दीर्घकाळा पासून शांततेच्या व लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. त्यांच्या मागण्या मराठा समाजाच्या भावना आणि अपेक्षांशी थेट निगडित आहेत.मात्र, गेल्या अनेक महिन्यां पासून या मागण्यांवर राज्य सरकारकडून अपेक्षित निर्णय न झाल्यामुळे संपूर्ण मराठा समाजामध्ये तीव्र अस्वस्थता आणि कमालीची नाराजी वाढत असल्याचे खा.सोनवणे यांनी पत्रात नमूद केले आहे.सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून,अशा रखरखत्या उन्हात मनोज दादा जरांगे-पाटील यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.या उपोषणा मुळे त्यांच्या प्रकृतीवर अत्यंत विपरीत परिणाम होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. मनोजदादांच्या आरोग्या बाबत राज्यातील कोट्यावधी मराठा बांधव-भगिनी कमालीचे चिंतित आहेत.

त्यामुळे राज्य सरकारने या विषयाची तातडीने गंभीर दखल घेऊन मनोज दादां शी सकारात्मक संवाद साधावा,त्यांच्या मागण्यांवर योग्य तो निर्णय घ्यावा आणि सुरू असलेल्या उपोषणाचा कायमस्वरूपी तोडगा काढावा,अशी आग्रही विनंती खासदारांनी केली आहे.पत्राच्या शेवटी खा. बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्य पद्धतीवर विश्वास व्यक्त केला आहे.आपण एक संवेदनशील आणि जनहितकारी मुख्यमंत्री म्हणून या अत्यंत संवेदनशील प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष द्याल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.सरकार यावर नक्कीच न्याय्य मार्ग काढून समाजामध्ये विश्वासाचे व सकारात्मक वातावरण निर्माण करेल, अशी आशा खा.सोनवणे यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!