शेलगाव गांजी येथे अवकाळी पावसाचा तडाखा ; शेतकऱ्याच्या गोठ्याचे मोठे नुकसान


केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथे अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला.जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकरी अमोल जाधव यांच्या गाय गोठ्यावर मोठे जांभळीचे झाड कोसळल्याने गोठा पूर्णतःउध्वस्त झाला आहे.वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे झाड अचानक गोठ्यावर पडल्याने गोठ्यावरील पत्रे,लाकडी साहित्य व बांधकामाचे मोठे नुकसान झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अवकाळी पावसामुळे शेतकरी अमोल जाधव यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत व भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला असून प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



