सामाजिक अंकेक्षणा साठी निवड झालेल्या साधन व्यक्तींना नियमित काम देण्याच्या मागणीचे रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरत गोगावले यांना निवेदन सादर


बीड/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी,मंत्रालय मुंबई अंतर्गत निवड झालेल्या साधन व्यक्तींना नियमित स्वरूपाचे काम उपलब्ध करून देण्यात यावे,अशी मागणी बीड जिल्ह्यातील साधन व्यक्तींनी रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरत गोगावले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे,गणेश काळे,रज्जाक शेख, शरद बारहाते आदी उपस्थित होते.
सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जिल्हाधिकारी कार्यालय,बीड यांच्या पदभरती जाहिरातीनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेसाठी बीड जिल्ह्यातून १०० साधन व्यक्तींची निवड करण्यात आली होती.
तसेच राज्यभरात सन २०२३ मध्ये सुमारे ३४०० साधन व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.मात्र निवड होऊन अडीच ते तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असतानाही या साधन व्यक्तींना केवळ सात महिन्यांचेच काम मिळाले असून उर्वरित काळात बेरोजगारीचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.यावेळी चर्चा करताना लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे यांनी सांगितले की,सामाजिक अंकेक्षण ही शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांमध्ये पारदर्शकता निर्माण करणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सातत्याने राबवून निवड झालेल्या साधन व्यक्तींना नियमित काम उपलब्ध करून देण्यात यावे.तसेच शासनाच्या विविध विभागांतील योजनांचे मूल्यांकन आणि सामाजिक अंकेक्षणाची जबाबदारीही साधन व्यक्तींमार्फतच प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय,मुंबई अंतर्गत निवड झालेल्या साधन व्यक्तींमार्फत प्रत्येक जिल्ह्यात विविध लोककल्याणकारी योजनांचे सामाजिक अंकेक्षण प्रभावीपणे राबविणे शक्य आहे.त्यामुळे शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन साधन व्यक्तींना बेरोजगार होण्यापासून वाचवावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांनी महाराष्ट्र राज्यातील ३४०० साधन व्यक्तींना नियमित मानधन आणि भत्ते तसेच काम उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.या निवेदनावर बाजीराव ढाकणे,गणेश काळे, रज्जाक शेख,शरद बारहाते यांच्यासह अन्य साधन व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या आहेत.



