सामाजिक

केज मध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी ; वीज पुरवठा खंडित, नागरिकांची उडाली धावपळ,तापमाना पासून दिलासा मिळाला असला तरी जनजीवन विस्कळीत ; गारांच्या वर्षावामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

केज/प्रतिनिधी

केज शहर व परिसरात आज शनिवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक हवामानात बदल होऊन जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसासोबतच काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.दरम्यान,वादळी वाऱ्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला होता.या पावसामुळे कडक उन्हाळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थंडावा मिळाल्याने तात्पुरता दिलासा मिळाला असला,तरी अचानक आलेल्या या संकटामुळे मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

अचानक बदलले वातावरण,गारांचा वर्षाव

गेल्या काही दिवसां पासून केज परिसरात प्रचंड उकाडा जाणवत होता.नागरिक उष्णतेने त्रस्त झाले होते.अशातच आज शनिवार,२३ मे रोजी संध्याकाळच्या सुमारास अचानक आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले आणि पाहता पाहता वेगवान वादळी वारे वाहू लागले.वादळी वाऱ्याच्या पाठोपाठ रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि काही वेळातच गारा पडू लागल्या.संध्याकाळच्या वेळी अचानक आलेल्या या वादळ-पावसामुळे रस्त्यावरील पादचारी, वाहनधारक आणि व्यावसायिकांची सुरक्षित जागा शोधण्यासाठी एकच धावपळ उडाली.

वीज पुरवठा खंडित, शहर अंधारात

वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वीज वितरण कंपनीच्या वतीने शहरा तील वीज पुरवठा तातडीने खंडित करण्यात आला.आधीच संध्याकाळची वेळ आणि त्यातच वीज गुल झाल्यामुळे संपूर्ण केज शहर काही काळ अंधारात बुडाले होते. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीतकरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे समजते.

उकाड्यापासून सुटका, पण शेतकरी चिंतेत

वातावरणात झाला थंडावा या अवकाळी आणि गारांच्या पावसा मुळे हवेत अचानक गारवा निर्माण झाला आहे.गेले कित्येक दिवस असह्य गरमीने हैराण झालेल्या केजकरांना या थंडाव्यामुळे मोठा दिलासा मिळाला असून वातावरणातील उष्णता कमी झाली आहे.परंतु, दुसरीकडे या वादळी वाऱ्याचा आणि गारांचा फटका परिसरातील आंबा पिकांना तसेच भाजीपाला व इतर पिकांना बसण्याची शक्यता असल्याने बळीराजा मात्र काहीसा चिंतेत पडला आहे. अचानक आलेल्या या पावसाने शहरात काही ठिकाणी किरकोळ पडझड झाल्याचीही प्राथमिक माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!