कृषीसामाजिक

दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्रातर्फे पशुआरोग्य शिबिराचे आयोजन 

अंबाजोगाई/प्रतिनिधी

दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाई यांच्या वतीने दिनांक २० मे २०२६ रोजी अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथे पशु आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरामध्ये शेतकऱ्यांना गोआधारित शेती,सेंद्रिय शेती तसेच पशुधन व्यवस्थापना बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सुगाव चे सरपंच श्री.बंडू मारुती शिंदे हे होते.यावेळी सुगाव चे रोजगार सेवक श्री.अतुल अभिमान शिंदे,प्रगतशील शेतकरी श्री.महादेव मारुती शिंदे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे पशु तज्ञ डॉ.रवींद्र कोरके उपस्थित होते.शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. रवींद्र कोरके यांनी सांगितले की,सध्याच्या परिस्थितीत शेती उत्पादन खर्चात मोठी वाढ होत असून शेतकऱ्यांनी गोआधारित व नैसर्गिक शेतीकडे वळणे काळाची गरज आहे.

जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून त्या आधारे संतुलित खत व्यवस्थापन करावे. रासायनिक खतांचा अतिरेकी वापर टाळून शेणखत, हिरवळीची खते,पिकांचे अवशेष, काडी-कचरा व इतर सेंद्रिय खतांचा वापर वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.ते पुढे म्हणाले की,मराठवाडा भागातील जमिनींमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अत्यंत कमी होत चालले असून ते वाढविण्यासाठी सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. पशुधनाचे आरोग्य सुधारण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने खाद्य व्यवस्थापन करणे तसेच नियमित दर तीन महिन्यांनी जंतनिर्मूलन करणे गरजेचे आहे.

पशुधनाला वेळापत्रका नुसार लसीकरण केल्यास विविध संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळते,असेही त्यांनी स्पष्ट केले. शिबिराचे उद्घाटन गावचे सरपंच श्री.बंडू मारुती शिंदे यांच्या हस्ते देशी गोवंश पूजन करून करण्यात आले.शिबिरा दरम्यान पशुधनांना जंतनिर्मूलनाच्या मात्रा देण्यात आल्या. एकूण १६६ पशुधनांवर जंत निर्मूलन उपचार करण्यात आले. या शिबिरात ४८ शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील प्रगतशील शेतकरी श्री.मारुती शिंदे व श्री.काकासाहेब अडसूळ यांनी विशेष सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!