दुबईच्या स्वस्त सोन्याच्या आमिषाने सोनाराला ३ लाखांचा गंडा ; पळणाऱ्या दरोडेखोरांचा अपघात अन् थेट बेड्या!

केज/प्रतिनिधी
दुबईहून छुप्या मार्गाने आणलेले सोने बाजार भावापेक्षा स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखवून एका सोनाराला भरदिवसा लुटल्याचा धक्कादायक प्रकार केज येथे घडला आहे.मात्र, ‘बुरा काम का बुरा नतीजा’ या उक्तीप्रमाणे, सोनाराला लुटून सुसाट पळणाऱ्या दरोडेखोरांच्या गाडीला काही अंतरावरच भीषण अपघात झाला.नियतीने त्यांना थेट पोलिसांच्या स्वाधीन केले असून, याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच हजार रुपये प्रति तोळा स्वस्त सोन्याचे आमिष
मिळालेल्या माहिती नुसार,माजलगाव तालुक्यातील टाकळगव्हाण येथील व्यावसायिक दत्तात्रय रामेश्वर काकडे यांना ‘अमोल शिंदे’ नावाच्या एका व्यक्तीने व्हॉट्सॲप वर संपर्क साधला होता. त्याने काकडे यांना दुबईचे सोने प्रति तोळा पाच हजार रुपयांनी स्वस्त देण्याचे आमिष दाखवले.या आमिषाला भुलून काकडे आपल्या कारागिरासह पैसे घेऊन केज-बीड रस्त्यावरील गंगा माऊली साखर कारखान्या समोरील एका शाळेजवळ पोहोचले.
लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत ३ लाख लुटले.त्या ठिकाणी आरोपींनी काकडे यांना पिवळा धातू दाखवून विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर अचानक काकडे यांच्या कारागिराकडील पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. काकडे यांनी याला कडाडून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता,आरोपींनी त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आणि त्यांचा मोबाईलही फोडून टाकला.दरोडेखोरांनी बॅगेतील ५०० रुपयांच्या नोटांचे ६ बंडल म्हणजेच एकूण ३ लाख रुपये काढून घेतले आणि रिकामी बॅग फेकून देऊन तेथून पळ काढला.
पळताना अपघात, पोलिसांच्या जाळ्यात
घटनेनंतर काकडे यांनी तात्काळ दरोडेखोरांचा मागोवा घेणे सुरू केले. काही अंतरावर असलेल्या टाकळी फाटा येथे दरोडेखोरांच्या वाहनाचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अपघातस्थळी आधीच पोलीस हजर होते. काकडे यांनी जवळ जाऊन पाहिले असता, अपघातात जखमी झालेले इसम दुसरे तिसरे कोणी नसून त्यांना लुटणारे दरोडेखोरच असल्याचे स्पष्ट झाले.
आरोपींची खरी नावे निष्पन्न अमोल शिंदे हे खोटे नाव सांगून फसवणूक करणाऱ्या या दोन्ही आरोपींची खरी नावे पोलिसांनी निष्पन्न केली आहेत: दशरथ उर्फ अप्पा शिवाजी शिंदे,विशाल रामकिशन शिंदे दोघे रा. मांडवा,जि.धाराशिव या चित्रपटाच्या कथेलाही लाजवणाऱ्या गुन्ह्याचा पुढील तपास केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप रामराव मांजरमे हे करत आहेत.



