साडेतीन वर्षाच्या बालिकेवर ६५ वर्षीय वृद्धाचा अत्याचाराचा प्रयत्न; केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील संतापजनक घटना

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील काळेगाव (घाट) येथे एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. ही घटना १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पीडित मुलीची आई कामावर गेलेली असताना,संशयित आरोपीने चिमुरडीच्या पाच वर्षांच्या भावाला खाऊचे आमिष दाखवून दुकानात पाठवले आणि त्यानंतर मुलीलाआपल्या घरात बोलावून दरवाजा आतून बंद केला.
काही वेळाने मुलगा दुकानातून परत आल्यावर बहीण न दिसल्याने त्याने घरात असलेल्या आजारी वडिलांना याची माहिती दिली.वडिलांनी शोध घेतला असता शेजाऱ्याचे घर बंद असल्याचे पाहून त्यांना संशय आला. आवाज देऊन घर उघडले असता संशयित आरोपी आणि मुलगी घरात मिळून आले.यावेळी नराधमाने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले.या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली असून या कृत्यामुळे परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.



