सामाजिक

सततच्या वीज खंडित होत असल्यामुळे समता नगर,आदर्श नगर मधील नागरिक हैराण ; काढून नेलेली डीपी परत बसवण्याची मागणी

केज/प्रतिनिधी

केज शहरातील समता नगर,आदर्श नगर,जलाल नगर भागातील वीज पुरवठा करणाऱ्या ‘चाटे डीपी’वर अतिरिक्त लोड येत असल्याने वारंवार फ्यूज उडण्याचे प्रकार घडत आहेत.तसेच कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे.यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिक भीषण उष्णतेचा तसेच पाणी टंचाईचा सामना करत असून,या समस्ये वर कायमस्वरूपी तोडगा म्हणून नवीन डीपी बसवण्याची मागणी नागरिकांनी महावितरण कडे केली आहे.

नेमकी अडचण काय?

बीड रोडवरील चाटे डीपी या विद्युत रोहित्रावर सध्या विद्युत भाराचे (लोड) प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामुळे या डीपीचा फ्यूज वारंवार उडतो.दिवसभर वीज खंडित होत असल्याने लहान मुले, वयोवृद्ध नागरिक आणि रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.उष्णतेमुळे हैराण झालेले नागरिक रात्रभर जागरण करत असून, वारंवार तक्रार करूनही ही समस्या सुटत नसल्याचे नागरिकांनी अर्जात नमूद केले आहे.

तसेच पाणी टंचाई उग्र रूप धारण करीत असुन बोअरमधील पाणी कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्यामुळे मोटार चालू होत नाहीत.

निवेदनातील मागण्या:

या संदर्भात समता नगर,आदर्श नगर,जलाल नगर मधील त्रस्त नागरिकांनी महावितरणच्या उप कार्यकारीअभियंता यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत :

विद्यमान चाटे डीपी त्वरित बदलून त्या ठिकाणी जास्त क्षमतेचा नवीन डीपी बसवण्यात यावा.जर एका डीपीवर लोड येत असेल तर त्या ठिकाणी अतिरिक्त डीपी कार्यान्वित करावा.आणि विद्युत पुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा.या निवेदनावर शेख साजेद रफिक यांच्यासह आसिफ मुलाणी, इब्राहिम शेख,सोहेल मुलाणी,शेख आयुब, झाकीर शेख आणि रहीम शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!