साध्वी प्रितीसुधाजी महाराज यांचे ८६ व्या वर्षी देहावसान


बीड/प्रतिनिधी
साध्वी प्रितीसुधाजी महाराज यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी अल्प आजाराने (संतारा व्रता मध्ये) देहावसान पुणे येथे झाले.वयाच्या १४ व्या वर्षी बाल ब्रह्मचारी महाराजांनी जैन भगवती दिक्षा अंगीकारली.संपूर्ण भारतामध्ये पायी भ्रमण करीत मानवासाठी व सर्व जीवाच्या कल्याणा साठी त्यांनी प्रवचन माले तून लोकांमध्ये ७२ वर्षे प्रबोधन केले.बीड शहराचा व साध्वीजींचा चातुर्मासामुळे खुप जवळचा संबध आला.
बीडमध्ये पहिला चातुर्मास १९७५ साली विजय टॉकीज येथे संपन्न झाला.या चातुर्मासामध्ये सर्वच धर्माच्या लोकांनी महाराजांचा ४ महिने प्रवचनाचा लाभ घेतला आणि हा चातुर्मास ऐसिहासिक झाला. यानंतर महाराजांची किर्ती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली.अनेक संत वचन जसे की,संत तुकाराम महाराज यांच्याअभंगाला अनुसरुन त्यांचे उदाहरण देत सर्वांना त्यांनी धर्मनिष्ठ करण्याचा संकल्प करण्याचे प्रबोधन केले.त्यांच्या प्रेरणेने देशामध्ये अनेक ठिकाणी गोरक्षण केंद्र उभा राहिली.तसेच अनेक ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून अध्यात्माचे धडे देणार्या शिक्षण संस्था उभा झाल्या.
गेल्या पंधरा वीस वर्षा पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुणे जवळील लोणीकंद येथे गोशाळा येथे जैनस्थानक निर्माण करुन तेथे त्यांनी आपल्या १५ सहकारी साध्वींबरोबर धर्म आराधना केली. चातुर्मासासाठी त्या या नंतरही विविध ठिकाणी प्रवचने दिली.बीड करांच्या स्मरणात राहील असा १९७५ सालचा चातुर्मास १९९३ साली शांती यात्रेच्या निमित्ताने केलेली प्रवचने,२०१२ साली खटोड प्रतिष्ठान च्या कीर्तन महोत्सवा मध्ये केलेली प्रवचने हे कायम स्मरणात राहिलेले आहे.
त्यांच्या प्रेरणेने कीर्तन महोत्सवामध्ये साध्वी प्रितीसुधाजी गोरक्षण केंद्र नामलगाव फाटा बंब परिवाराच्या वतीने सुरु करण्यात आलेले आहे.त्यांच्या अमोघ वाणीतून समाजाला त्यांनी प्रेरित करुन एक नवीन जीवन जगण्याची प्रेरणा मिळालेली आहे.साध्वी प्रितीसुधाजींच्या (संतरा व्रत) देहावसनाने सर्व समाज शोकाकुल झाला आहे.साध्वीजींच्या पार्थीवावर पुणे येथील लोणीकंद येथे गोरक्षण केंद्राच्या प्रांगणात आज दि.१ मे २०२६ रोजी सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.



