केज घरकुल घोटाळा पहिल्या गुन्ह्याची नोंद ; भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे फुटले बिंग! प्रसार माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर, आ.नमिता मुंदडा यांचा विधानसभेत पाठपुरावा यशस्वी ; गरीबांचे पैसे हडपणाऱ्यांचे धाबे दणाणले

केज/प्रतिनिधी
केज येथील नगर पंचायतीमध्ये ‘प्रधानमंत्री आवास योजने’त (घरकुल) झालेल्या कोट्यवधींच्या निधी वाटपाचा पर्दाफाश झाला असून,या प्रकरणी सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरिबांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या या घोटाळे बाजांनी कुठल्याही प्रकारच्या कामाच्या संचिका न ठेवता निधीची सरळ लूट केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या असून उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी या घोटाळ्याचा सखोल तपास केला असता, अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.लाभार्थ्यांना पैसे मिळण्याऐवजी ठेकेदारांना आणि कर्मचाऱ्यांना निधीची खिरापत वाटण्यात आली.विशेष म्हणजे, ज्या ठेकेदारांना कोट्यवधी रुपये देण्यात आले, त्यांच्या कामाच्या वर्कऑर्डर,मेजरमेंट बुक (MB),ईस्टीमेट किंवा बिल अशा कोणत्याही कायदेशीर संचिका नगर पंचायतीमध्ये उपलब्ध नाहीत.”अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही” या तत्त्वावर हा सगळा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.प्रसार माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर
आमदार नमिता मुंदडा यांची आक्रमक भूमिका घेत या घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत हा प्रश्न अत्यंत आक्रमकपणे लावून धरला होता. गरिबांच्या हक्काच्या घरात आडवे येणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी सातत्याने लावून धरली.त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच प्रशासनाला ही कठोर पावले उचलावी लागली आहेत.सहा जणांवर गुन्हा दाखल झाला असला तरी,अद्याप एक मोठा अधिकारी यातून सुटला आहे.त्या मुख्य सूत्रधारावर गुन्हा नोंद होईपर्यंत आणि ठेकेदारांकडून वसुली होऊन गरीबांना त्यांचे हक्काचे पैसे मिळेपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील,असा ठाम निर्धार आमदार नमिता मुंदडा यांनी व्यक्त केला आहे.
जनशक्ती आणि लोकशाहीच्या आयुधांचा विजय
हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठीसामाजिक कार्यकर्ते कपिल मस्के, सकाळचे दत्ताभाऊ देशमुख,भाई मोहन गुंड, पञकार प्रकाश मुंडे यांच्यासह केज मधील पत्रकार बांधवांनी आणि जागरूक नागरिकांनी लोकशाहीच्या मार्गाने लढा दिला.माहितीचा अधिकार आणि आंदोलनांच्या माध्यमा तून या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने अखेर भ्रष्टाचाऱ्यांचे ‘बिंग’ फुटले आहे.आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधारावर कधी कारवाई होते आणि सर्वसामान्य लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे पैसे कधी मिळतात,याकडे संपूर्ण केज तालुक्याचे लक्ष लागले आहे.



