स्व.विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमाला पुष्प- ७ वे, माध्यमे ही केवळ माहितीचे साधन न राहता,ती लोकशाही मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि सत्यतेच्या आधारावर चालणारी असावीत – सुहास सरदेशमुख


केज/प्रतिनिधी
युद्धाचे सर्वसामान्य परिणाम अत्यंत विनाशकारी आणि दीर्घकालीन असतात,जे केवळ लढणाऱ्या देशांवरच नाही,तर संपूर्ण जगाला विनाशाच्या दिशेने घेऊन जातात. युद्धामुळे मानवी संस्कृती आणि प्रगती कित्येक वर्षे मागे जाते.दुसऱ्या महायुद्धासाठी जबाबदार असलेला ॲडॉल्फ हिटलर तसेच विन्स्टन चर्चिल हे युद्धाचे वार्ताहर व नंतर सूत्रधार झाले. बदलत्या काळात युद्धासाठी घातक शस्त्र तयार करण्याचे तंत्र विकसित झाले.युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वात होरपळणारी व्यक्ती म्हणजे महिला.
या परिस्थितीत माध्यमांची भूमिका फार महत्त्वाची ठरते.परंतु सध्याचे चित्र पाहता सध्याचे जर्नालिझम हे हेल्थ नसून ते वेल्थ बनले आहे.आपल्या माईंडसेट चा ताबा माध्यमांनी घेतला आहे.माध्यमांचे देखील स्वतःच्या काही गरजा असतात.तरीही त्यांनी संवेदनशीलता टिकून ठेवणे गरजेचे आहे.युद्धाचे खरे वास्तव माध्यमांनी दाखवले पाहिजे. सध्याच्या काळामध्ये माध्यमे ही केवळ माहितीचे साधन न राहता,ती लोकशाही मूल्ये,सामाजिक जबाबदारी आणि सत्यतेच्या आधारावर चालणारी असावीत असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर येथील सुहास सरदेशमुख यांनी केले.
केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेमध्ये दि.२६ एप्रिल रोजी जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित स्व. विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमालेचे समारोपाचे पुष्प गुंफण्या साठी प्रमुख वक्ते म्हणून श्री.सुहास सरदेशमुख विशेष प्रतिनिधी दै. लोकसत्ता,छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित होते.तर अध्यक्ष म्हणून दै.सकाळचे ज्येष्ठ पत्रकार श्री.दिपकराव देशपांडे यांनी उपस्थिती दर्शवली.इतर उपस्थित मान्यवरांमध्ये श्री. शहाजी चव्हाण तुळजाई प्रतिष्ठान,मतिमंद प्रकल्प आळणी,धाराशिव. जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे सहसचिव उपेंद्र कोकीळ,कोषाध्यक्ष फजिलोद्दीन काजी तसेच संस्थेचे जेष्ठ संचालक युवराज दादा काळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी लाभलेल्या उपस्थित पाहुण्यांचा परिचय स्व. विश्वंभर कोकीळ जीवन विकास व्याख्यानमालेचे कार्यवाह मेघशाम मंगरूळकर यांनी दिला. सातवे पुष्प गुंफताना “युद्धजन्य परिस्थितीत माध्यमांची भुमिका.” या विषयावर बोलताना सुहास सरदेशमुख पुढे म्हणाले की,युद्धजन्य परिस्थितीचा सर्वसामान्यावर परिणाम होतोच,परंतु उच्च शिक्षण घेणाऱ्या परदेशातील विद्यार्थ्यांवरही होतो.
अशा परिस्थितीत अहिंसा हे मानव हिताचे शक्तीस्थान ठरते. राष्ट्रपिता महात्मागांधींचा युद्धाला विरोध होता. सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाणारे खान अब्दुल गफार खान हे गांधीजींचे सच्चे अनुयायी होते.गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्यातत्त्वांचा त्यांच्यावर सखोल प्रभाव होता.त्यांनी पठाण समाजात शांतता व शिस्त रुजवण्यासाठी हिंसक समजल्या जाणाऱ्या वायव्य सरहद्द प्रांतात धर्माच्या नावावर फाळणी नको,या विचारासाठी आयुष्यभर लढा दिला.तेव्हायाप्रसंगी सुहास सरदेशमुख यांनी जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या अनेक व्यक्तिमत्त्वांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला.
अध्यक्षीय समारोपात दिपकराव देशपांडे म्हणाले की,सध्याच्या या युद्धजन्य परिस्थितीमध्ये माध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाचे ठरते. कारण युद्धजन्य परिस्थितीमध्ये माध्यम बॉण्ड्रीवर नसतात. त्यामुळे युद्धाचे खरे वास्तव माध्यमांनी दाखवले पाहिजे.युद्धा मुळे फार मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते.युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतात. खरंतर राज्यकर्त्यांच्या अतिरेकामुळे स्वराष्ट्राची परिस्थिती बिघडते. शेवटी ते म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या युद्धामध्ये शाळेवर बॉम्ब हल्ला होणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.
या परिस्थितीमध्ये भारताने घेतलेली तटस्थ भूमिका हा अहिंसेचाच भाग आहे.कार्यक्रमाचे सुञसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी केले तर आभार व्यक्त करताना मेघशाम मंगरूळकर यांनी यावर्षी २६ व्या वर्षात पदार्पण केलेल्या स्व.विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यान मालेसाठी निमंत्रित सन्माननीय व्याख्याते व अध्यक्षांचे तसेच या कार्यक्रमाला आपल्या दैनिकातून प्रसिद्धी देऊन सहकार्य केलेल्या सर्व पत्रकार बंधूंचेही मनःपूर्वक आभार व्यक्त केले.शेवटी कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.



