

केज/प्रतिनिधी
भारतीय सिनेमा हा दादासाहेब फाळके यांच्या पौराणिक कथां पासून ते आजच्या डिजिटल काळातील वास्तववादी आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत विश्वापर्यंत,प्रेक्षकांच्या बदलत्या आवडी निवडी नुसार स्वतःला सतत बदलत आला आहे. कोविड नंतरच्या काळा मध्ये नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम आणि डिज्नी हॉटस्टार सारख्या ओटीटी माध्यमांनी चित्रपटगृहांचा पर्याय उपलब्ध करून दिला. यामुळे आशयघन आणि धाडसी विषयांना वाव मिळाला.प्रादेशिक चित्रपट आता केवळ स्थानिक राहिले नसून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत आहे.
पॅन-इंडिया सारख्या चित्रपटांनी भाषा आणि भौगोलिक मर्यादा ओलांडून राष्ट्रवाद, इतिहास आणि भव्यता या त्रिवेणी संगमासह प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.आजचा प्रेक्षक वास्तववादी,थरारक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कंटेंटला अधिक पसंती देत आहे.पण आपण सिनेमाचा दुसरा अंग पाहिलं तर सध्या स्वस्त झालेल इंटरनेट प्रचंड घातक बनत आहे. करमणूक गरजेचे आहे परंतु ते प्रमाणात असावे. सिनेमाने आपली धारणा तर मोबाईल ने मोबाईल ने जीवनपद्धती बदलली आहे.सध्या बुद्धीभेद करणारे सिनेमा येत आहेत.तेंव्हा सिनेमाकडे प्रबोधनाचे माध्यम म्हणून पाहिले पाहिजे असे प्रतिपादन मुंबई येथील लेखक,दिग्दर्शक व चित्रपट प्रशिक्षक बापू सर्वगोड यांनी केले.
केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेमध्ये दि.२५ एप्रिल रोजी जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित स्व. विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमालेचे सहावे पुष्प गुंफण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री. बापू सर्वगोड लेखक, दिग्दर्शक,चित्रपट प्रशिक्षक,मुंबई हे उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून श्री.प्रविणजी देशपांडे संचालक,दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँक लि.परळी वैद्यनाथ हे उपस्थित होते.इतर उपस्थित मान्यवरांमध्ये जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे, सचिव जी.बी.गदळे, सहसचिव उपेंद्र कोकीळ, कोषाध्यक्ष फजिलोद्दीन काजी,जेष्ठ पत्रकार दिपकराव देशपांडे, गुरुलिंग मुळे,अस्मिता जाधव,स्नेहा मंगसुळीकर शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे आदींनी उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमासाठी लाभलेल्या उपस्थित पाहुण्यांचा परिचय रघुनाथ चौरे यांनी दिला. सहावे पुष्प गुंफताना “भारतीय चित्रपट सृष्टी : बदलती निर्मिती आणि प्रेक्षकांच्या अभिरुचीचा प्रवास.” या विषयावर बोलताना श्री.बापू सर्वगोड पुढे म्हणाले की, एकत्र कुटुंबपद्धती भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य होते पण आता विभक्त कुटुंब पद्धती उदयास आली आहे. आपली कृषी ही खरी संस्कृती होती.धर्म,अर्थ, काम,आणि मोक्ष या तत्त्वावर आपली जीवन पद्धती अवलंबून होती. परंतु आता विवाह संस्कृती देखील विकृती कडे चालली आहे.आज समाज माध्यमे देखील विकली जात आहेत. याला कुठेतरी सरकारी यंत्रणा देखील तितकीच जबाबदार ठरत आहेत. शेवटी ते म्हणाले की, कला,नाटक,साहित्य व सिनेमा या क्षेत्रात अभिजात रसग्रहण हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अध्यक्षीय समारोपात प्रविणजी देशपांडे म्हणाले की,स्व.विश्वंभर कोकीळ जीवन विकास व्याख्यानमालेने यावर्षी २६ व्या वर्षात पदार्पण केले आहे.ही खरोखरच आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आजपर्यंत या व्याख्यान माले मध्ये जवळपास सबंधं महाराष्ट्रातून १५० पेक्षा अधिक व्याख्याते सहभागी झाले आहेत. ही व्याख्याते विविध विषयांना स्पर्श करण्याचे काम करतात.यातून उपस्थित श्रोत्यांना प्रचंड ज्ञानाची शिदोरी मिळते आहे.हे खरोखरच कौतुकास्पद आहे.कार्यक्रमाचे सुञसंचलन विक्रम डोईफोडे यांनी केले तर आभार विनोद गुंड यांनी मानले.शेवटी कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.



